जळगाव : पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर तापीवरील हतनूर धरणाचे ४६ पैकी १८ दरवाजे रविवारी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले. विदर्भासह मध्य प्रदेशातील पावसामुळे अचानक आवक वाढल्याने हतनूरचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असताना, तापी नदीला पूर आला आहे. प्रशासनाने नदी काठावरील गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात जुलैचा शेवटचा आठवडा सुरू असूनही समाधानकारक पावसाचा अद्यापही अनुभव आला नसल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये काहीशी चिंता निर्माण झाली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात अधूनमधून होत असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाला वेळोवेळी धरणाचे दरवाजे उघडून विसर्ग नियंत्रित करण्याची गरज भासत आहे. काही दिवसांपूर्वीही यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच हतनूरचे १६ दरवाजे एक मीटरने उघडावे लागले होते. त्यानंतरही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात पाण्याची पातळी सातत्याने वाढत गेली. त्यामुळे पाटबंधारे विभागाने सहा दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न होता. आता पुन्हा एकदा पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे हतनूर धरणाच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या आवकेमुळे तब्बल १८ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून, विसर्ग व्यवस्थापनाचे काम सुरू झाले आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १२ वाजेपर्यंत हतनूरचे सहा दरवाजे एक मीटरने उघडे होते. मात्र, त्यानंतर धरणातील पाणी पातळीत मोठी वाढ होत असल्याचे लक्षात आल्याने रात्री दोनच्या सुमारास आणखी चार दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले. त्यानंतरही आवक थांबत नसल्याने तीनच्या सुमारास चार आणि रविवारी पहाटे पाच वाजता चार दरवाजे एक मीटरने उघडले गेले. अशा प्रकारे विसर्ग वाढविण्यासाठी रात्रभरात हतनूरचे तब्बल १२ दरवाजे उघडण्यात आले. हतनूरच्या सध्या उघड्या असलेल्या दरवाजांची संख्या १८ पर्यंत पोहोचली आहे. ज्या माध्यमातून धरणाच्या सांडव्यातून सुमारे ३३ हजार ५४९ क्सूसेक आणि कालव्यातून १०० क्यूसेकने विसर्ग होत आहे. रविवारी सकाळी पाच वाजेपर्यंत हतनूरची पाणी पातळी २१०.४४ मीटरपर्यंत होती.
सध्या सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरण व शेळगाव बॅरेजमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरणातील पातळी कायम राखण्यासाठी विसर्ग वाढवावा लागत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि धरणातील पाण्याची आवक आणखी वाढल्यास हतनूर व शेळगाव बॅरेजमधून होणारा विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे. नदीच्या दोन्ही काठांवर असलेल्या गावांना संभाव्य पूर परिस्थितीचा सामना त्यामुळे करावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे. वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.