जळगाव – विविध कारणांनी कापसाची शेती नुकसानीची ठरत असताना जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदा कपाशीचे क्षेत्र कमी करून मका आणि सोयाबीन पिकावर भर दिला आहे. मात्र, पीक उगवल्यावर तणांचा बंदोबस्त करण्यासाठी तणनाशक फवारल्यानंतर तणांसह सोयाबीनचे पीकही करपल्याने अनेकांना आता मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कापसासह उडीद, मूग, तीळ, ज्वारी, बाजरी आणि मक्याची शेती करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अलिकडील काही वर्षात तेलबिया वर्गातील सोयाबीन पिकाकडेही मोर्चा वळविला आहे. जिल्ह्यातील सोयाबीन पिकाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र १९ हजार ४९८ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात, यंदाच्या खरिपात कपाशी लागवडीत निरूत्साह असताना सोयाबीनचे क्षेत्र ३१ हजार ५५० हेक्टरपर्यंत (१६२ टक्के) पोहोचले आहे. सोयाबीन पिकाशी स्पर्धा करणाऱ्या तणांचे वेळीच नियंत्रण न केल्यास उत्पादनात सरासरी ३० ते ४० टक्क्यांपर्यंत घट येऊ शकते. त्यामुळे बरेच शेतकरी सोयाबीन उगवण्यापूर्वी आणि उगवण पश्चात तणनाशकांचा वापर करतात. मात्र, मक्याच्या तुलनेत सोयाबीनची तणनाशक सहनशीलता कमी असल्याने शिफारशीनुसार तणनाशकांची फवारणी न केल्यास नुकसान होण्याची शक्यताही तितकीच असते. त्याची प्रचिती सोयाबीनचे पीक घेणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांना यंदा आली आहे.
तणनाशकाचे असे दुष्परिणाम
जिल्ह्यात यंदा पावसाला अजूनही म्हणावा तसा जोर नाही. जमिनीत पुरेसा ओलावा नसताना तणनाशक फवारल्यामुळेही सोयाबीनचे पीक करपण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले आहेत. काही ठिकाणी पीक करपण्याचे प्रमाण तुलनेत कमी असले, तरी पिकाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. त्यापासून चांगले उत्पादन मिळण्याची आशा धुसर आहे. महागडे बियाणे तसेच रासायनिक खते वापरून मोठ्या कष्टाने जगविलेल्या पिकाची अशी वाताहत झाल्याने संबंधित सर्व शेतकरी निराश झाले आहेत.
वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करता कापसाच्या शेतीतून नफा कमी आणि तोटाच जास्त होत असे. त्यामुळे यंदाच्या खरिपात सोयाबीनचे पीक घेतले. निंदणीची मजुरी वाचविण्यासाठी तणनाशक फवारल्यावर तणांबरोबर सोयाबीनही करपले.- सोमनाथ पाटील (शेतकरी, ममुराबाद, जि. जळगाव)
शेतकऱ्यांनी सोयाबीनवर तणनाशक फवारताना शिफारशीनुसार मात्रा घेतली पाहिजे. शक्यतो तणनाशकाबरोबर द्रवरूप रासायनिक खते किंवा किटकनाशकांचे मिश्रण करू नये. जमिनीत ओलावा असेल तरच तणनाशक फवारावे. तणनाशकाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना नाही.- हेमंत बाहेती (प्रमुख शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव)