जळगाव : शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात बऱ्यापैकी घसरण झाल्याचे दिसून आले होते. मात्र, गुरूवारी दुपारपर्यंत पुन्हा मोठी वाढ नोंदवली गेल्याने सोन्याच्या दराने आणखी उसळी घेतली.
सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये काही दिवसांत विशेष दखल घेण्यासारखी हालचाल दिसून आली नव्हती. आंतरराष्ट्रीय बाजारात किरकोळ चढ-उतार सुरू असताना, देशांतर्गत बाजारपेठेत दोन्ही धातुंचे दर जवळपास स्थिर राहिले. धनत्रयोदशी-लक्ष्मीपूजनानंतर झालेली किंमतीतील घसरण थांबून दोन्ही धातुंचे दर थोडे स्थिरतेकडे झुकले. लग्नसराईचा हंगाम सुरू होत असल्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही बाजारातील हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवून होते. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती पाहता भविष्यात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी तेजी किंवा घसरण होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे खरेदीदारांसाठी हा काळ तुलनेने अनुकूल ठरू शकतो. खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना बाजारातील हालचालींवर सतत लक्ष ठेवणे फायदेशीर ठरेल.
गुरुवारी स्थानिक बाजारात सोन्याच्या किमतींमध्ये बरीच वाढ नोंदवण्यात आली. अमेरिकेतील रोजगार आकडेवारी अपेक्षेपेक्षा मजबूत आल्यानंतर या वर्षी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली, ज्यामुळे डॉलर कमकुवत झाला. आणि सोन्यासारख्या मौल्यवान धातूंना आधार मिळाला. एमसीएक्स (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वरील डिसेंबर महिन्याच्या सोने आणि चांदीच्या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्समध्येही सुरुवातीच्या सत्रात चढ-उतारानंतर वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या बाजारात जास्त करून चढ-उताराचे वातावरण पाहायला मिळाले आहे. काही दिवस सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती, तर काही दिवस दरात घसरणही झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती, डॉलरच्या मूल्यातील बदल आणि गुंतवणूकदारांच्या हालचाली यांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे.
दोन-तीन दिवसांपासून सोन्याचे दर काही प्रमाणात घसरले असले, तरी दर घसरण मर्यादित स्वरूपाची राहिली. जळगाव शहरातही मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार २१८ रुपयांपर्यंत होते. बुधवारी दिवसभरात ७३६ रुपयांची घट नोंदवली गेल्याने सोने जीएसटीसह एक लाख २३ हजार ४८२ रूपयांपर्यंत खाली आले होते. गुरूवारी दुपारपर्यंत पुन्हा ९४२ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख २४ हजार ४२४ रूपयांपर्यंत जाऊन पोहोचले.
चांदीचे दर स्थिर
जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख ५६ हजार ५६० रुपयांपर्यंत होते. बुधवारी दिवसभरात २०६० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी एक लाख ५४ हजार ५०० रुपयांपर्यंत खाली आली होते. गुरूवारी दुपारपर्यंत कोणतीच वाढ अथवा घट नोंदवली गेली नाही. त्यामुळे चांदीचे दर एक लाख ५४ हजार ५०० रूपयांवर स्थिर राहिले.
