मालेगाव : ५०० रुपयांच्या नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोन भामट्यांना मालेगावच्या किल्ला पोलिसांनी शुक्रवारी रात्री पकडल्यावर आता या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर येत आहे. विदर्भाच्या वर्धा येथील एका घरात या नोटांची छपाई करुन मालेगावात वेगवेगळ्या ठिकाणी त्या नोटा खपविण्यात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी दोघा साथीदारांना पकडल्याची कुणकुण लागतात नकली नोटांची छपाई करणारा मुख्य सूत्रधार वर्धा येथून फरार झाला आहे.
काही जागरूक नागरिकांनी माहिती दिल्यावरून किल्ला पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर पाटील यांच्या पथकाने शहरातील गजबजलेल्या तांबा काटा भागातून धनराज नारायण धोटे (२०) व राहुल कृष्णराव आंबटकर (२५) या दोन्ही भामट्यांना ५०० रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असताना रंगेहात पकडले. त्यांच्या ताब्यातून ५ लाख ४३ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच १३ हजार रुपये किंमतीच्या शंभर व दोनशे रुपयांच्या खऱ्या नोटा असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी किल्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे दोघे भामटे वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. वर्धा येथील ईश्वर लालसिंग यादव हा या नोटांची छपाई करुन देत होता व हे दोघे या नोटा मालेगावात खपवण्याचे उद्योग करीत असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. गर्दीच्या ठिकाणी विशेषत: वृद्ध दुकानदारांकडे या नोटा देऊन ते वस्तू खरेदी करीत असत. वस्तूंची किंमत जाऊन शिल्लक राहिलेले पैसे ते दुकानदाराकडून मिळवत असत. अशाप्रकारे २० हजाराच्या बनावट नोटांच्या माध्यमातून १३ हजार रुपये खरे चलन पदरात पाडून घेण्यात ते यशस्वी झाल्याचे आढळून आले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा हा उद्योग सुरू असल्याचा पोलिसांना संशय आहे. ईश्वर याचे नाव पुढे आल्यावर वर्धा येथील त्याच्या भाड्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून ५०० रुपयांच्या १४४ बनावट नोटा, प्रिंटर, लाकडी व काचेची फ्रेम, शाईची बाटली, छपाईसाठीचे कागद असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस तेथे पोहोचण्यापूर्वी तो मात्र फरार होण्यात यशस्वी झाला. येथील किल्ला पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण चव्हाण हे या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.
१५ दिवसांपूर्वी ५०० रुपयांच्या नकली नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मध्यप्रदेशातील रॅकेटचा मालेगाव तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला. त्या प्रकरणात बऱ्हाणपूर येथील मौलाना मोहम्मद जुबेर व नाझीर आक्रम, मालेगावमधील तौसिफ अंजूम अन्सारी व चांदवडमधील अमजद शहाबुद्दीन कोतवाल अशा चौघांना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा मास्टरमाईंड मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील निलंबित वैद्यकीय अधिकारी प्रतीक नवलखा व आणखी एक जण अद्याप फरार आहे. या संशयीतांकडून जवळपास ३५ लाखाच्या बनावट नोटा आतापर्यंत पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी छडा लागलेल्या नकली नोटा संदर्भातील या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असतानाच्या काळातच ह्या भामट्यांचे शहरात नकली नोटा खपवण्याचे उद्योग बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे दुसरे प्रकरण उघडकीस आले. त्यावरुन या भामट्यांचे निर्ढावलेपण देखील समोर येत आहे.
