नाशिक – हिमाचल प्रदेशातील मेजर इशा ठाकूर आणि पंजाबमधील मेजर जगमित कौर या दूरसंवेदकामार्फत संचलित होणाऱ्या मानवरहित विमानाच्या (आरपीएएस अर्थात ड्रोन) देशातील पहिल्या महिला प्रशिक्षक झाल्या आहेत. गांधीनगर येथील आर्मी एव्हिएशन स्कूलचा (कॅट्स) दीक्षांत सोहळा शुक्रवारी आर्मी एव्हिएशन कोअरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

कोम्बॅक्ट एव्हिएटर्स, हेलिकॉप्टर प्रशिक्षक, मानवरहित विमान संचलन व प्रशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करणारे अधिकारी या दीक्षांत सोहळ्यात लष्करी हवाई दलात दाखल झाले. यात नेपाळ आणि नायजेरियासह तीन भारतीय नौदलातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सोहळ्यात दलातर्फे हेलिकॉप्टर आणि मानवरहित विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यानिमित्ताने मेजर इशा ठाकूर आणि मेजर जगमित कौर या मानवरहित विमान अर्थात ड्रोनच्या पहिल्या महिला प्रशिक्षक बनल्या आहेत. हेलिकॉप्टर वैमानिकापाठोपाठ लष्कराने ड्रोन संचलनात मुलींना संधी उपलब्ध केली. आरपीएएस संचलनात महिलांचा सहभाग वाढत आहे. पंजाब येथील जगमित कौर यांंचे वडील व आजोबा सैन्य दलात होते. तर हिमाचल प्रदेशातील इशा ठाकूर यांचे वडील हॉटेल व्यावसायिक असून आई शिक्षिका आहे.

सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांचा विकास

लष्करी हवाई दलात दाखल होणारे अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि दूरसंवेदकांमार्फत नियंत्रित केली जाणारी मानवरहित विमाने (आरपीएएस अर्थात ड्रोन) यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी सीमावर्ती भागात पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. तसेच आघाडीवरील तळांवर हेलिकॉप्टर संचलनासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांकडे लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचे आर्मी एव्हिएशन कोअरचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विनोद नांबियार यांनी सांगितले. कोम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूल १७ अभ्यासक्रमांतून लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करीत आहे. हवाई प्रशिक्षणात आभासी प्रशिक्षणावर (सिम्युलेटर) लक्ष केंद्रीत करण्यात आले. युद्ध कारवाईत नवीन संकल्पना राबविण्यात कॅट्स आघाडीवर आहे. बहुविध कारवाईत हेलिकॉप्टर व ड्रोन हे मध्यवर्ती घटक असतील.

सर्व मोहिमांमध्ये आर्मी एव्हिएशन प्रथम प्रतिसाद देणारे असेल. एकात्मिक थिएटर कमांड संकल्पनेत हायब्रिड तसेच पारंपरिक मोहिमेत आर्मी एव्हिएशन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे नांबियार यांनी सांगितले. आपल्या सर्व मोहिमेत सुरक्षित उड्डाणास प्राधान्य देण्याची गरज त्यांनी मांडली. लष्करी उड्डाण नेहमीच जोखमीने भरलेले असते. आपण अशा लाल रेषा ओलांडू नयेत, ज्यामुळे मोहीम व स्वतःला धोका निर्माण होतो. नियमावलीचे काळजीपूर्वक पालन करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

कँप्टन अमन वशिष्ठ सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीं

कॉम्बॅक्ट एव्हिएटर्स प्रशिक्षणात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा किताब कॅप्टन अमल वशिष्ठ यांना मिळाला. त्यांना सिल्व्हर चीता चषकाने सन्मानित करण्यात आले. तर मानवरहित विमानाच्या (आरपीएएस अर्थात ड्रोन) प्रशिक्षणात मेजर सीराज, हेलिकॉप्टर प्रशिक्षक अभ्यासक्रमात मेजर सचिन गुलिया व ड्रोन प्रशिक्षक अभ्यासक्रमात लेफ्टनंट कर्नल रणजित यांना विविध चषकांनी सन्मानित करण्यात आले.