नाशिक : महामार्ग बस स्थानकात चालकाचे नियंत्रण सुटून इ बस थेट नियंत्रण कक्षात शिरली आणि बसच्या प्रतिक्षेत थांबलेले प्रवासी त्याखाली सापडले. या विचित्र अपघातात एका महिलेचा मृत्यू तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनिवारी रात्री सव्वादहा वाजता हा अपघात झाला. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार शिर्डी-नाशिक इलेक्ट्रिक बस रात्री सव्वादहा वाजता स्थानकात आली होती. बस फलाटावर उभी केल्यानंतर प्रवासी उतरले. त्यानंतर चालकही बसची नोंद करण्यासाठी खाली उतरले व नंतर पुन्हा बसमध्ये आले. यावेळी बस सुरू करताच मोठा आवाज होऊन उसळी घेत ती थेट समोरील नियंत्रण कक्षास धडकली. स्थानकावर अन्य प्रवासी बसच्या प्रतिक्षेत होते. नियंत्रण कक्षालगत प्रवाशांसाठी प्रतिक्षालय आहे.

हेही वाचा…नाशिकमध्ये युवकाची हत्या, चार संशयित ताब्यात

तिथे बसची प्रतीक्षा करणारे काही जण त्याखाली सापडले. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातामुळे स्थानकात एकच गोंधळ उडाला. अपघातग्रस्त बस मागे घेऊन त्याखाली सापडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. संबंधितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. यातील अंजली नागार्जुन (२३, पटछवा, आंध्रप्रदेश) यांचा मृत्यू झाला. पती मुल्लापा नागार्जुन यांच्या सोबत देवदर्शनासाठी त्या नाशिकमध्ये आल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात ग्रस्त इ बसचा चालक विलास आव्हाड याला ताब्यात घेतले. प्रथमदर्शनी इ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे राज्य परिवहन महामंडळाने म्हटले आहे. बसची धडक इतकी जबरदस्त होती की स्थानकावरील नियंत्रण कक्षाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त इ बस ही नाशिक दोन आगारातील खासगी बस आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik bus lost control at highway station crashing into control room woman died and passengers injured sud 02