नाशिक – रस्ते, गटार आणि नाले सफाईची कामे तातडीने पूर्णत्वास नेऊन पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणी फलक आणि पूरक्षेत्रातील गावांची यादी तयार करून पावसाळ्यातील आपत्तीच्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशी सूचना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी प्रशासकीय यंत्रणेला केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत वाघ यांनी मार्गदर्शन केले. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीने मान्सूनपूर्व रस्ता दुरुस्ती, गटार आणि नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे. नियंत्रण कक्ष त्वरीत स्थापन करावेत. पर्यटन स्थळांवरील धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्या ठिकाणी सूचना फलक लावण्याचे सूचित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी तसेच सर्व तहसीलदारांनी पूरक्षेत्रात असणाऱ्या गावांची यादी तयार करुन ठेवावी. पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा संदेश गावपातळीवर देण्याचे नियोजन करावे. लघु आणि मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास तत्काळ दुरूस्ती करून घ्यावी. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे आणि झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.

पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा, विसर्ग, पर्जन्यमान आदींची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास पाठवावी. महावितरणने विद्युत वाहिन्यांचे आवश्यक कामे पूर्ण करुन पाणीपुरवठा योजना, नगरपालिकेच्या क्षेत्रातील वीज पूरवठा मान्सून काळात खंडित न करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी दिल्या. यावेळी पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांनी मान्सूनपुर्व आराखडा सादर केला.