नाशिक : येवला तालुक्यातील नगरसूल शिवारात बिबट्याचा वावर असून आमदार वस्तीवरील शेळी बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहे. नगरसूल येथे रेल्वेमार्गालगत बेंडके वस्तीवर सोमवारी सायंकाळी आणि त्यानंतर बोढारे-पवार वस्तीवर रात्री लोकांना बिबट्या दिसला. परिसरात रात्री फटाके वाजवून गोंगाट करण्यात आला. रात्री वनपाल भाऊसाहेब माळी, वनरक्षक गोपाल राठोड, गोपाल हरगावकर हे इतर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. गाडीव्दारे फिरुन त्यांनी लोकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या.

मंगळवारी सकाळी शंकर महाले यांच्या वस्तीवर बिबट्या दिसून आला. दुपारी साडेतीनच्या सुमारास नगरसूल-नांदगाव रोडवरील मानमोडी शिवारातील बाळकृष्ण भगत यांच्या शेतात त्यांच्या पत्नीला बिबट्या दिसला. सायंकाळी आमदार वस्ती येथील संजय आव्हाड यांच्या शेतात अलका आव्हाड या शेतात काम करत असताना बांधावर बांधलेली शेळी पाहून बिबट्याने हल्ला केला. आजूबाजूच्या शेतातील लोक धावून आल्याने बिबट्या पळून गेला. त्यानंतर काही वेळात त्यांच्याच शेततळ्यावर पाणी पिण्यासाठी आलेला बिबट्या सर्वांनी पाहिला. कटके- कापसे वस्ती रोडलगत असणाऱ्या नारायण कमोदकर यांच्या गटातील घरामागे रात्री बिबट्या दिसला. परिसरातील नागरिकांनी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : नाशिक: लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकासह शिपायास न्यायालयीन कोठडी

बिबट्या हा रस्ता चुकल्याने नगरसूल परिसरात दोन-तीन दिवसांपासून फिरत आहे. परिसरातील लोकांनी आपली जनावरे , वासरे, गाई ,शेळ्या कुंपणात बंदिस्त कराव्यात. रात्रीच्या वेळी बाहेर निघताना आवाज करून बाहेर निघावे.

अक्षय मेहेत्रे (वनपरिक्षेत्र अधिकारी, येवला)