नाशिक : सातपुर विभागातील कार्बन नाका भागात आणि शिवाजीनगर येथे महानगरपालिका शाळेलगत अशा दोन ठिकाणी १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती सुरू झाल्याने या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे लागणार आहे. त्यामुळे शुक्रवारी सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ, १०, ११ आणि नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सात, १२ अशा एकूण पाच प्रभागात सकाळी नऊ वाजेपासून पाणी पुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. शनिवारी उपरोक्त भागात सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बाबतची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. दोन ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली असून शुक्रवारी दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या काळात सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठमधील बळवंत नगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाईपलाईन रोड, काळेनगर, सदगुरुनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, शंकरनगर, चित्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर, प्रभाग १० मधील अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तुनगर, विवेकानंद नगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर आणि प्रभाग ११ मधील प्रबुद्ध नगरसह इतर परिसरात सकाळी नऊ वाजेपासून पाणी पुरवठा होणार नाही.

हेही वाचा : नाशिक : कुंभारवाड्यात वाहनांची जाळपोळ, पोलिसांपुढे आव्हान

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष जलकुंभ परिसर, नरसिंहनगर, पूर्णवादनगर, अरिहंत रुग्णालय परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा, आनंदनगर, डी. के. नगर, शांतीनिकेतन सोसायटी परिसर, आयचित नगर, चैतन्यनगर, सहदेवनगर, पंपिंग स्टेशन, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर, सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लीकर रुग्णालय परिसर, जेहान चौक भाग तसेच प्रभाग १२ मधील रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड, शिवगिरी सोसायटी, एस. टी. कॉलनी आणि शहीद चौक परिसरात शुक्रवारी पाणी पुरवठा होणार नाही. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर शनिवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकानी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik no water supply in five wards on friday due to water pipeline leakage css
First published on: 22-02-2024 at 12:11 IST