जळगाव – ढोलताशांचा गजर आणि संबळ वाद्यांच्या तालावर सातपुड्यातील आदिवासींनी केलेले पारंपारिक नृत्य… सर्जा राजाच्या जोड्यांना केलेला साज श्रृंगार, यामुळे जळगावमधील जैन इरिगेशनतर्फे साजरा होणारा पोळा दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. यंदा तर पोळा फोडणाऱ्या सालदारांना २० हजार रूपयांची बक्षीसे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी २९ वर्षांपूर्वी पारंपरिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्याची प्रथा सुरू केली होती. ती प्रथा पुढील पिढीने कायम ठेवली आहे. यंदाही नव्या पिढीला भारतीय कृषी संस्कृती अनुभवता यावी आणि त्याचे महत्त्व समजावे, या मुख्य हेतुने शाळांसह महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना, शहरातील मान्यवरांना हा उत्सव अनुभवण्यासाठी आवर्जून आमंत्रित केले होते.
जैन हिल्सवरील कृषी संशोधन प्रात्याक्षिक केंद्राच्या शेती विभागाच्या विविध ठिकाणच्या सालदार मंडळींनी बैलांना पोळ्यासाठी सजवले होते. तेथूनच सजवलेल्या बैलांची सवाद्य मिरवणूक निघाली. कंपनीचे संस्थापक भवरलाल जैन यांचे स्मृतिस्थळ श्रद्धा ज्योत येथे त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. मारूतीच्या मंदिराचे दर्शन घेऊन सरस्वती पॉईंट, गुरुकुल पार्किंग मार्गे निघालेली सवाद्य मिरवणूक जैन हिल्स हेलीपॅडच्या मैदानात पोहोचली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते धवल ध्वज फडकावून बैल पोळ्याची सुरूवात झाली.
यंदाच्या पोळा सणाचा द्विगुणीत व्हावा, यासाठी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेतून पोळा फोडण्याचा मान पटकावणाऱ्या सालदारांच्या रोख पारितोषिकात वाढ करण्यात आली. त्यानुसार २० हजार रुपयांचे रोख पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते सालदारांना वितरीतही झाले. जैन वाड्यावरील सालदार हंसराज जाधव आणि अविनाश गोपाळ यांना पहिला मान मिळाला. विशेष म्हणजे हंसराजने यावर्षी सलग चौथ्यांदा पोळा फोडण्याचा मान मिळवला आहे. दोघांना प्रत्येकी पाच हजार रुपये, तर जैन सोसायटीचे दिलीप पावरा, साजन पावरा यांना प्रत्येकी दोन हजार रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. उर्वरित सहा सालदारांना तिसऱ्या क्रमांकाचा मान मिळाला. त्यात गोविंद पावरा, भगवान सावळे, वाल्मिक शिंदे, किशोर शिंदे, रामसिंग पवार यांचा समावेश होता.
अशोक जैन आणि ज्योती जैन, निशा जैन, शोभना जैन, डॉ. भावना जैन यांच्यासह जैन परिवाराच्या हस्ते बैल जोड्यांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि ऐश्वर्या रेड्डी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख, डॉ. शेखर रायसोनी, अग्रणी बँकेचे सुनील दोहरे, महाराष्ट्र राज्य क्रेडाईचे उपाध्यक्ष अनिश शहा, आर्किटेक्ट शिरीष बर्वे, स्वरुप लुंकड, पारस राका, गोटूशेठ बंब, नंदलाल गादीया, माजी नगरसेवक अमर जैन, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर, डॉ. कल्याणी नागूलकर, गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अधिष्ठाता प्रा. गीता धरमपाल उपस्थित होते. किशोर कुळकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.