जळगाव – अमळनेर तालुक्यात एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात भरकटलेल्या दोन दुचाकींना भरधाव मालमोटीरीने धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील एक प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाली. ही घटना गुरूवारी सायंकाळी उशिरा हेडावे रस्त्यावर घडली.

विश्वनाथ हिंमत भिल्ल (३०) आणि ज्योती विश्वनाथ भिल्ल (२५, दोन्ही रा. एकरूखी, ता. अमळनेर) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तसेच बाळू साहेबराव पाटील (५०) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर-हेडावे रस्त्यावर भिल्ल दाम्पत्य त्यांच्या दुचाकीवरून जात असताना त्याच वेळी बाळू पाटील हे दुसऱ्या दुचाकीवरून आले.

दोन्ही दुचाकी समोरासमोर आल्यानंतर विश्वनाथ भिल्ल आणि बाळू पाटील यांच्याकडून एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे अचानक गोंधळलेल्या दोन्ही दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटले. तितक्यात भरधाव वेगाने हेडावे रस्त्याने आलेल्या मालमोटारीने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली.

तिहेरी अपघातात एका दुचाकीवरील विश्वनाथ भिल्ल आणि त्यांची पत्नी ज्योती भिल्ल यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील बाळू पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच अमळनेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील नागरिकांच्या मदतीने पती-पत्नीचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अमळनेर ग्रामीण रूग्णालयात रवाना केले. जखमी बाळू पाटील यांना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्याची व्यवस्था केली. शुक्रवारी उत्तरीय तपासणीनंतर भिल्ल दाम्पत्याचे मृतदेह नातेवाईकांना सोपविण्यात आले.

अमळनेर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली असून, निरीक्षक निकम पुढील तपास करीत आहे. भिल्ल दाम्पत्याच्या मागे दोन मुलगे आणि वयोवृद्ध आई-वडील असा परिवार आहे. परिवारातील कर्त्या व्यक्तींचा असा अचानक अपघातात मृत्यू झाल्याने भिल्ल कुटुंबाचा आधार हरपला. एकरूखी गावासह परिसरात त्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.