जळगाव – शहरातील राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती आणि जुन्या बसस्थानकालगत महापालिकेने सुमारे ८० लाख रूपये खर्चून आधुनिक शौचालये उभारली आहेत. मात्र, त्यापैकी एक शौचालय गेल्या अनेक महिन्यांपासून तसेच वापराविना पडून आहे. त्याचा काही एक उपयोग होत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेने शहरातील विविध भागात उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची आधीच अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. अनेक शौचालयांचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहू लागल्याने सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे. ही अस्वच्छता नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असून, दुर्गंधी आणि रोगराईचा प्रसार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही शौचालये तर गेल्या अनेक महिन्यांपासून बंदच आहेत. ज्यामुळे नागरिकांना उघड्यावरील प्रातःविधीसह इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, महापालिकेने शहरातील मध्यवर्ती आणि जुन्या बसस्थानकालगत नव्याने आधुनिक शौचालये उभारली आहेत. त्या कामाकरीता दोन्ही बसस्थानकांची मोक्याची जागा ताब्यात घेण्यात आली असून, प्रत्येकी ४० लाखांप्रमाणे सुमारे ८० लाख रूपयांचा निधीही खर्च झाला आहे.
असे असताना, दोन्ही आधुनिक शौचालये गेल्या अनेक महिन्यांपासून तशीच वापराविना पडून होती. महापालिकेसह स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या निधीतून उभारण्यात आलेली दोन्ही शौचालये इतक्या दिवसांपासून का कार्यान्वित केली जात नाही, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता. अखेर, मध्यवर्ती बसस्थानकालगतचे शौचालय कार्यान्वित झाले आहे. मात्र, जुन्या बसस्थानकालगतचे दुसरे शौचालय अजुनही वापरात आलेले नाही. किंवा ते सुरू करण्यासाठी महापालिका प्रशासनाने अद्याप हालचाल केल्याचे दिसत नाही. सदरचे शौचालय सुरू झाल्यानंतर नवी पेठेसह पोलन पेठ, दाणा बाजार, शास्त्री टॉवर आणि चित्रा टॉकीज चौक परिसरातील व्यापारी, ग्राहक आणि नागरिकांची सोय होऊ शकणार आहे.
दरम्यान, जळगाव शहरात सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था एक गंभीर समस्या बनली आहे. नियमित स्वच्छतेचा अभाव, तोडफोड यामुळे नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित सार्वजनिक शौचालयांचा लाभ मिळत नाही. स्वच्छ भारत अभियानासारख्या उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण होण्यातही शौचायलयांची समस्या एक मोठा अडथळा ठरत आहे. पावसाळ्यात सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे स्वच्छता न झाल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि आजारांचा धोका वाढतो. शौचालयांच्या नियमित देखभालीसाठी आणि स्वच्छतेसाठी यंत्रणा उभारण्याची गरज त्यामुळे व्यक्त होत आहे.
जळगाव शहरात मध्यवर्ती आणि जुन्या बस स्थानकालगत महापालिकेकडून उभारण्यात आलेली दोन्ही आधुनिक शौचालये चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी मध्यवर्ती स्थानकालगतचे शौचालय निविदा मंजूर होऊन वापरात आले आहे. – उदय पाटील (सहाय्यक आयुक्त, आरोग्य विभाग, महापालिका)