जळगाव – जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील ग्रंथालयांना पुस्तकांचा पुरवठा न करता आधीच सही व शिक्के असलेले पत्र जमा करून घेतले होते. ज्यांचा वापर करून नंतर पुस्तके मिळाल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला. बहुतेक सर्व प्रमाणपत्रे ही एकाच ठिकाणाहून सोयीनुसार तयार करून घेतल्याचे उघडकीस आले आहे.

सर्व प्रमाणपत्रांचे स्वरूप एकाच प्रकारचे असल्याबद्दल विचारणा केल्यावर पुस्तक पुरवठादार संस्थेचे ते काम असल्याचे सांगून अंगावरील घोंगडे झटकण्याचा प्रयत्न जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने केला आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून विधान परिषदेच्या तत्कालिन आमदार स्मिता वाघ यांच्या निधीतून २०१९-२० मध्ये सुमारे २० लाखांची पुस्तके खरेदी केली होती. इतक्या वर्षानंतर त्या प्रकरणाशी संबंधित तक्रार राज्याच्या ग्रंथालय संचालनालयासह राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे करण्यात आली असून, बऱ्याच ग्रंथालयांना कोणतीच पुस्तके मिळाली नसल्याचे म्हटले आहे. पुरावा दाखल संबंधित ग्रंथालय व वाचनालयांकडून प्राप्त लेखी पत्रेही तक्रारीसोबत जोडण्यात आली आहेत. विशेष म्हणजे काही ग्रंथालयांना २०१९ व २०२० या वर्षाची पुस्तके २०२३-२४ मध्ये वितरीत केली आहेत. बऱ्याच ग्रंथालयांना अद्याप कोणतीच पुस्तके मिळालेली नाहीत. तर काही ग्रंथालयांना ९० हजार रुपयांऐवजी फक्त ३० ते ४५ हजार रुपयांची पुस्तके पुरविण्यात आली आहेत. ही सर्व माहिती माहितीच्या अधिकारातून उघड झाल्यानंतर तक्रारदाराने चौकशीची मागणी केली आहे.

दरम्यान, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने तक्रारदारासह जिल्ह्यातील अन्य ग्रंथालयांकडून पुस्तके प्राप्त झाल्याबद्दलची प्रमाणपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्षात जवळपास ९० टक्के प्रमाणपत्रे ही एका जागेवर बसून सोयीनुसार व्यवस्थित टंकलिखित करून घेतल्याचे आढळले.

आमदार निधीतून खरेदी केलेली पुस्तके जळगाव जिल्ह्यातील ग्रंथालयांना पुरविण्याची जबाबदारी धुळे येथील एका खासगी संस्थेची होती. त्यांनीच संबंधित ग्रंथालयांकडून पुस्तके मिळाल्याची प्रमाणपत्रे सादर केली आहेत.

सुहास रोकडे (जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जळगाव)