जळगाव – जिल्ह्यातील जनावरांवर आढळलेल्या विषाणूजन्य लम्पी त्वचा रोगाने आता चांगलेच पाय पसरले आहे. गेल्या महिनाभरात सुमारे १०६५ जनावरांना लम्पीची बाधा झाली असताना, त्यापैकी ४० जनावरांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

लम्पी हा विषाणूजन्य रोग असून तो प्रामुख्याने गाय, बैल आणि वासरे, अशा गोवंशीय जनावरांमध्ये आढळतो. या रोगाचा प्रसार डास, माशा, गोचीड, चिलट्या यासारख्या रक्तशोषक कीटकांद्वारे जास्तकरून होतो. याशिवाय बाधित जनावरांच्या जखमा, शरीरातील स्त्राव किंवा त्यांच्या संपर्कातील वस्तूंमधूनही हा आजार पसरू शकतो.

लम्पी बाधित जनावरांना साधारण १०४ ते १०५ अंशाचा ताप येतो, त्यांचे खाणे-पिणे कमी होते आणि अंगावर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी तयार होतात. पायांना सूज येऊन जनावरे लंगडायला लागतात. डोळे व नाकातून स्त्राव वाहतो. दूध उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. लम्पी वेळीच आटोक्यात न आल्यास जनावरांच्या मृत्यूचीही शक्यता असते. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी त्वचा रोगाची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण आहे.

२३ जुलैअखेर जिल्ह्यात एकूण १६६ जनावरे लम्पी रोगाने बाधित असताना त्यापैकी सहा जनावरे मृत्युमुखी पडली होती. तर ५० जनावरांमध्ये वेळेवर उपचार झाल्याने सुधारणा दिसून आली होती. दरम्यान, लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लसीकरणासह उपचारांवर भर दिला. प्रत्यक्षात, त्यानंतरही २६ जुलैपर्यंत जिल्ह्यातील लम्पी बाधित जनावरांची संख्या २६५ पर्यंत पोहोचली. त्यापैकी १२ जनावरांचा मृत्यू होऊन ६३ जनावरे उपचारानंतर सुधारली होती.

ताज्या आकडेवारीनुसार लम्पी बाधित जनावरांची संख्या १०६५ इतकी असून, त्यापैकी ४० जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर ५५८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. सध्या ४६७ जनावरांवर ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचार सुरू आहेत. पशुसंवर्धन विभागाने लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरू केलेले लसीकरण ९७ टक्के पूर्ण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश काय ?

जळगावमधील १५ तालुक्यांत तब्बल ९६ ठिकाणी गोवर्गीय जनावरांमध्ये लम्पी रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा रोग अतिशय संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यातील निरोगी पशुधनास मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी तातडीने प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात जनावरांचे बाजार, शर्यती, वाहतूक बंदी लागू करण्यात आली आहे. सर्व गोवर्गीय जनावरांचे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, म्हैस वर्गासह शेळी आणि मेंढ्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्याने त्यांचे बाजार सुरूच राहतील. सार्वजनिक चराई आणि पाणी व्यवस्था तात्पुरती थांबविण्याचे तसेच मृत जनावरांची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.