जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांच्या बंगल्यातून ६७ ग्रॅम सोने, ७.५ किलो चांदी, ३५ हजार रूपये रोख, सीडी, पेन ड्राईव्ह आणि बरीच काही महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. प्रत्यक्षात, सोने-चांदी आणि पैशांपेक्षा सीडी जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. जिल्ह्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून काढणाऱ्या त्या सीडीचे गूढ आणखी जास्त वाढले आहे.
ईडीसह इतर काही आर्थिक व्यवहाराच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला असताना, आमदार एकनाथ खडसे यांनी कथित सीडीचा बऱ्याच वेळा उल्लेख केला होता. तुमच्याकडे ईडी असेल तर माझ्याकडे सीडी आहे, असे ते जाहीर सभांमधून सांगताना दिसून येत असत. त्यामुळे त्या सीडीत असे नेमके आहे तरी काय, असा प्रश्न खडसेंच्या कट्टर विरोधकांसह जिल्ह्यातील नागरिकांना पडला होता. एक प्रकारे सीडीचा ढालीसारखा वापर करून आपल्यावरील चौकशीच्या संकटांना परतवून लावण्याचा प्रयत्न खडसे यांनी बरेच दिवस केला होता. परिणामी, विशेषतः भाजपमधील गिरीश महाजन यांच्यासारखे काही कट्टर विरोधक त्यांना थोडे दचकूनच राहत होते. अर्थात, विविध प्रकरणांच्या चौकशीसह दंडाच्या कारवाईमुळे थेट गळ्याशी पाणी आल्यानंतरही खडसे यांनी ती सीडी कधी बाहेर काढलीच नाही.
दरम्यान, गिरीश महाजन यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित प्रफुल्ल लोढा हा एकनाथ खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर टाकून खळबळ उडवून दिली. त्यानंतर खडसे यांनीही छायाचित्रातील गाडीत मीच बसलो होतो आणि लोढा रस्त्यात फुले देऊन माझेच स्वागत करत होता. मात्र, तेव्हा लोढा मला सीडी देणार होता. ज्यामुळे पुढे जाऊन मंत्री महाजन उघडे पडले असते, असा गौप्यस्फोट केला. तेवढ्यावरच न थांबता महाजन यांचे कारनामे सीडीत असल्यामुळेच पोलीस वारंवार प्रफुल्ल लोढाच्या घराची झडती घेत असल्याचा दावाही खडसे यांनी केला होता. महाजन यांनी आपले पितळ उघडे पडू नये म्हणून लोढाची त्यावेळी मनधरणी करण्यासाठी मुंबईतील एका हॉटेलमध्ये तीन महिने त्याचे पाय दाबले. कोणतेच पुरावे माझ्या हाती लागू दिले नाही. ती सीडी मिळाली असती तर कदाचित बरेच काही घडले असते, अशीही खंत खडसे यांनी व्यक्त केली होती.
कालांतराने हनी ट्रॅप प्रकरण थंड बस्त्यात गेले. सीडीवरून उठलेले वादळ आपोआप शांत झाले. खडसे आणि महाजन यांनीही सीडीचा विषय नंतर कुठे काढला नाही. मात्र, खडसेंच्या जळगावमधील बंगल्यात चोरी झाल्यापासून कथित सीडी पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. सोने, चांदीसह पैशांसोबत सीडी, पेन ड्राईव्ह आणि काहींच्या भ्रष्टाचाराच्या पुराव्यांची महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली असताना, वैयक्तिक खडसे यांना सीडी गेल्याचे जास्त दुःख झाले आहे. चोर नेमके सोने-चांदी चोरण्यासाठी आले होते की सीडी चोरण्यासाठी, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या सर्व प्रकरणामागे कोणाचा राजकीय हात असल्याचा थेट उल्लेख त्यांनी अद्याप केलेला नाही. मात्र, आपल्याजवळ बरेच पुरावे आहेत आणि आपण ते पोलिसांना देणार असल्याचे खळबळजनक विधान त्यांनी केले आहे.
