जळगाव – शहराच्या बाहेरून जाणारा बाह्यवळण महामार्ग वाहतुकीला खुला झाल्यानंतर उत्तरेला नवीन जळगाव वसण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याशिवाय, शहराच्या त्या बाजुला सुमारे २४ किलोमीटरचा नवीन काँक्रीट रस्ता तयार केला जात असल्याने विकासाला आणखी चालना मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत सुमारे साडेचारशे किलोमीटरचे रस्ते मंजूर करण्यात आले आहेत. आणि त्यासाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. ज्यामध्ये जळगाव ते किनगाव या रस्त्याचाही समावेश करण्यात आला आहे. २४ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यासाठी तब्बल ९९ कोटी रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. प्रत्येक किलोमीटरसाठी साधारणतः ४.१२ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्याची तरतूद असल्याने कंत्राटदाराकडून त्यादृष्टीने सदर रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.
संबंधित कंत्राटदाराने प्रत्यक्ष कामाला काही दिवसांपासून सुरूवात केल्याचे दिसत आहे. सद्यःस्थितीत जळगावकडून पाळधी ते तरसोद बाह्यवळण महामार्गावरील उड्डाणपुलापासून पुढे ममुराबाद गावाकडे या नवीन रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली आहे. कंत्राटदाराला निविदेतील अटी व शर्तीनुसार संपूर्ण रस्त्याचे काम दोन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करावे लागणार आहे.
विशेष म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील १० वर्षे रस्त्याची देखभाल आणि दुरूस्ती करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असणार आहे. ट्रिमिक्स पद्धतीने केल्या जाणाऱ्या काँक्रिटीकरणामुळे जळगाव ते किनगाव रस्त्याचे काम दर्जेदार होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जळगावहून ममुराबाद-विदगावमार्गे किनगावकडे जाताना संपूर्ण परिसरात सुपिक काळ्या मातीची जमीन आहे. त्यावर तसाच काँक्रीट रस्ता तयार केल्यानंतर त्यास पुढे जाऊन मोठे तडे पडण्याचा किंवा रस्ता खचण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने शासन निविदेनुसार मातीचा भूभाग साधारणपणे चार ते पाच फुटांनी उकरून काढून त्या जागी मुरूमाचा भराव कंत्राटदाराकडून सध्या केला जात आहे. मुरूमीकरण पूर्ण झाल्यानंतरच पुढील काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरूवात होणार आहे.
रस्त्याच्या कामाचे असे असेल स्वरूप
जळगाव–किनगाव रस्त्याचे काम करताना मध्यभागी सात मीटर (२३ फूट) रूंदीत काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा मुरूम भरलेल्या साईडपट्ट्या असतील. ममुराबादसह विदगाव, डांभूर्णी या काही गावांमध्ये काम करताना सात मीटर रूंदीच्या काँक्रिटीकरण रस्त्याशिवाय दोन्ही बाजुला पेव्हर ब्लॉक बसविले जातील. त्यानंतर सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी दुतर्फा गटारी बांधल्यात येतील. रस्त्याच्या कामात येणाऱ्या खासगी बांधकामांवर त्यामुळे हातोडा पडण्याची चिन्हे आहेत.
जळगाव–किनगाव या राज्यमार्गासाठी ९९ कोटींचा निधी मंजूर आहे. त्यातून २४ किलोमीटर अंतरात सात मीटर रूंदीचे काँक्रिटीकरण प्रस्तावित आहे. -इम्रान शेख (कार्यकारी अभियंता, पायाभूत सुविधा विकास महामंडळ)