जळगाव : शहरातील सराफ बाजारात अक्षय्य तृतीयेला १५४५ रुपयांची घट नोंदविण्यात आल्यानंतर २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले होते. शुक्रवारी पुन्हा १२३६ रुपयांची घट दुपारपर्यंत झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९६ हजार ६१४ रुपयांपर्यंत खाली आले.

सराफ बाजारात अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला मंगळवारी ५१५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा ९९ हजार ३९५ रुपयांपर्यंत वधारले होते. मात्र, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यात १५४५ रुपयांची घट झाल्याने सोन्याचे दर प्रतितोळा ९७ हजार ८५० रुपयांपर्यंत घसरले. सोन्याचे दर बऱ्यापैकी कमी झाल्याचा सकारात्मक परिणाम सराफ बाजारातील एकूण उलाढालीवर देखील जाणवला. अलीकडच्या काही दिवसांत सोने आणि चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. विशेषतः अक्षय्य तृतीयेपासून हे दर घसरताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत लक्षणीय घसरण झाली असून, त्यामुळे सामान्य खरेदीदारांना थोडा दिलासा मिळाला आहे.

सध्या लग्नसराई सुरू असल्यामुळे सोने-चांदीची मागणी वाढलेली असताना, तशात दर कमी झाल्याने ग्राहक वर्गात समाधानाचे वातावरण आहे. सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरची स्थिती आणि गुंतवणूकदारांचा कल, या सगळ्याचा परिणाम सराफ बाजारावर होत आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किमतीने एक लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. ज्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. मात्र, दर पुन्हा एकदा कमी झाल्याने ग्राहकांनी हात सैल सोडला असून, सराफ बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत सोन्याचे दर स्थिर राहतील की त्यात आणखी घसरण होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात सोने खरेदीच्या बेतात असलेल्या ग्राहकांसाठी हे दिवस अनुकूल ठरू शकतात.

चांदीच्या दरात १०३० रुपये घट

जळगावमध्ये अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो एक लाख ९४० रुपये होते. शुक्रवारी दुपारपर्यंत १०३० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याने चांदीचे दर प्रतिकिलो ९८ हजार ८८० रुपयांपर्यंत घसरले.