जळगाव – सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी देखील दोन्ही धातुंच्या किंमतीत प्रत्येकी १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आली. विशेषतः चांदी आता एक लाख २० हजार रूपये किलोच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.

जळगावमध्ये मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो एक लाख १८ हजार ४५० रूपयांपर्यंत पोहोचले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदीचे जीएसटीसह सुमारे एक लाख १९ हजार ४८० रूपयांपर्यंत गेले. चांदीच्या दरात गेल्या पाच दिवसात ३०९० रूपयांची वाढ झाल्याचे दिसून आले असून, दरवाढीत यापुढेही सातत्य राहण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याची जागतिक आर्थिक अनिश्चितता, परदेशी बाजारातील मागणीत झालेली वाढ, अमेरिकन डॉलरचे मूल्य कमी होणे आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षित संपत्तीकडे कल, या सर्व गोष्टींमुळे सोने व चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय, भारतात सण-उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम जवळ आल्याने स्थानिक बाजारातही सोन्या-चांदीची मागणी वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. परिणामी, देशांतर्गत व जागतिक स्तरावर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवली जात आहे.

सोने आणि चांदी दररोज नवीन उच्चांक निर्माण करत असल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दर कमी झाल्याने मधल्या काळात सोने व चांदीच्या खरेदीसाठी ग्राहक थोडेफार फिरकत होते. आता पुन्हा दरवाढ सुरू झाल्याने ग्राहक कमी होण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. सध्या विविध देशांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न आणि अमेरिका विविध देशांवर सातत्याने लादत असलेल्या जकातींमुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती दररोज चढ-उतार अनुभवत आहेत. अमेरिकेकडून भारतावर लादल्या जाणाऱ्या जकातीबाबतचा निर्णय एक ऑगस्टपर्यंत अपेक्षित आहे. त्याचाही परिणाम देशांतर्गत बाजारावर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

सोन्याच्या दरातही वाढ

जळगावमध्ये मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख दोन हजार ६९१ रूपयांपर्यंत पोहोचले होते. बुधवारी सकाळी बाजार उघडल्यावर १०३० रूपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर एक लाख तीन हजार ७२१ रूपयांपर्यंत गेले. सोन्याच्या दरातही गेल्या पाच दिवसात २२६६ रूपयांची वाढ झाली आहे.