जळगाव : शहर बससेवा बंद पडल्याने हाल सोसणाऱ्या जळगावकरांना दिलासा देण्यासाठी महापालिकेतर्फे लवकरच पीएम ई-बससेवा सुरू केली जाणार आहे. त्यासाठीच्या हालचालींना वेग आला असून, ई-बसचे मार्ग तसेच थांबे, पायाभूत सुविधांचा आढावा खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
पीएम ई बस प्रकल्पामुळे पर्यावरणपूरक वाहतूक प्रणाली विकसित होऊन शहराच्या विकासाला नवा आयाम मिळणार आहे. स्वच्छ, हरित आणि सुलभ वाहतुकीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले जाणार आहे. आढावा बैठकीत आयुक्त ढेरे यांनी ई-बसचे प्रस्तावित मार्ग, नागरिकांच्या सुविधा आणि वाहतुकीच्या नियोजनासंदर्भात सविस्तर माहिती सादर केली.
जेबीएफ इकोलाईफ कंपनीतर्फे १२ मीटर लांबीच्या २४, नऊ मीटर लांबीच्या सहा तसेच सात मीटर लांबीच्या २० ई-बस पुरविण्यात येणार आहेत.त्या हिशेबाने महापालिका प्रशासनाने शहरातील शिवाजी उद्यानालगत आगार आणि चार्जिंग स्थानकाचे काम काही दिवसांपासून हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात जेबीएफ इकोलाईफ कंपनीकडून ३० बस पुरविण्यात येणार आहेत. संबंधित गाड्यांच्या चालकांचे वेतन आणि देखभाल-दुरूस्तीचा खर्च कंपनी स्वतः करणार आहे.
जुन्या बस स्थानकातून सुटणाऱ्या ई-बस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह पाळधी, जळगाव खुर्द, म्हसावद, शिरसोली, उमाळा, कानळदा, विदगाव, शेळगाव, चिंचोली, धानवड, सावखेडा, हरीविठ्ठलनगर, खंडेरावनगर, मोहाडी, पिंप्राळा हुडको, कोल्हे हिल्स, मेहरूण पाटचारी, निमखेडी, गणेश कॉलनी, एमआयडीसी अजिंठा चौफुली या मार्गांवर प्रस्तावित आहे. ठिकठिकाणचे थांबेही निश्चित करण्यात आले आहेत. बसेस उपलब्ध झाल्यानंतर साधारण १५ ऑगस्टपासून ई-बस सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली.