जळगाव : पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक येथे हिवरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेली १४ वर्षीय मुलगी पाय घसरून पडल्याने बेपत्ता झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. सायंकाळी उशिरापर्यंत शोध घेऊन ती सापडली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्याला सुरूवात करण्यात आली. दरम्यान, नात पाण्यात वाहून गेल्याचे समजताच मुलीच्या आजोबांचाही हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

नीता संतोष भालेराव (१४, रा.वडगाव टेक, ता. पाचोरा) असे पाण्यात वाहुन गेल्याने बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. तर श्यामराव विठ्ठल खरे (७२), असे हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. नीता तिच्या मामीबरोबर नेहमीप्रमाणे हिवरा नदीवर शुक्रवारी दुपारी कपडे धुण्यासाठी गेली होती. त्याच वेळी अचानक तिचा पाय घसरला आणि ती थेट नदीत जाऊन पडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर आधीच हिवरा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहासोबत नीता देखील वाहून गेली. तिला वाचविण्यासाठी तिच्या मामीने सुद्धा नदीच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्या देखील बुडू लागल्या. घडलेली घटना लक्षात येतात आजुबाजुच्या नागरिकांनी मामी आणि भाचीला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोघींपैकी फक्त मामीला वाचविण्यात यश आले.

दुसरीकडे, आपली नात हिवरा नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती समजताच तिचे आजोबा श्यामराव खरे यांना घरी हृदय विकाराचा झटका आला. आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे खरे परिवारावर एकाच वेळी दुःखाचा दुहेरी आघात झाला. नीता ही पाचोरा शहरात नववीच्या वर्गात शिकत होती. लहानपणीच वडील वारल्याने ती वडगाव टेक येथे आजोळी बहिणीसोबत राहत होती. तिची आई मजुरीसाठी दुसऱ्या शहरात वास्तव्यास आहे. नीताचा शोध घेण्यासाठी पाचोरा नगरपालिकेची अग्निशमन यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, सगळीकडे शोध घेऊनही नीता शुक्रवारी सायंकाळपर्यंत सापडली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी पुन्हा नीताचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली.

गिरणात वाहून गेलेला तरूण बेपत्ताच

गणेश विसर्जनासाठी गेलेला गणेश गंगाराम कोळी (२७) हा तरूण गिरणा नदीत वाहून गेल्याची घटना सहा सप्टेंबर रोजी घडली होती. तेव्हापासून बेपत्ता असलेल्या गणेशचा शोध अजुनही लागलेला नाही. जळगाव तालुका पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाने संपूर्ण गिरणा काठ पिंजून काढला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. कदाचित तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर खाली तापी नदीत वाहू गेला असेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.