नाशिक – ग्रामीण भागात बिबट्याचे हल्ले वाढत असून महिनाभरात चार बालकांना जीव गमवावा लागला. काही जण जखमी झाले. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे ग्रामीण भागात भीतीचे सावट असून नाशिकमध्ये बिबट्या-मानव संघर्ष तीव्र होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ऊस, मक्याच्या शेतात बिबटे वास्तव्य करतात. त्यांचे बछडेही आढळतात. वन्य क्षेत्राबाहेर बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्याच्या दृष्टीकोनातून गांभिर्याने विचार सुरू आहे.

नाशिक तालुक्यात वडनेर, पाठोपाठ सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला. मागील आठवडाभरात चार ते पाच ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या. मागील काही वर्षात बिबट्यांची संख्या आणि मानवी वसाहतीलगत वावर वाढला आहे. नाशिक, सिन्नर, इगतपुरी, निफाड आणि काही प्रमाणात दिंडोरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावात अक्षरशः दहशतीचे वातावरण आहे.

अंधार पडल्यानंतर नागरिकांना बंदीस्त करून घेण्याची वेळ येत आहे. भारनियमनामुळे रात्रीच्यावेळी शेतीला पाणी द्यायला जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. पूर्वी रात्रीच्यावेळी बिबट्यांचे हल्ले होत असत. मात्र मागील काही घटनांमधून दिवसादेखील त्यांनी हल्ला केल्याचे समोर आले आहे. यामुळे दहशतसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर, खासदार राजाभाऊ वाजे यांनी उपवनसंरक्षक सिध्देश सावर्डेकर यांच्याबरोबर बैठक घेतली. यावेळी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा झाली. नागरिकांचे समुपदेशन व प्रशिक्षण, बिबट्यांचा माग काढण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करणे, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत बिबट्याचा धोका ही बाब समाविष्ट करणे, पिंजऱ्यांची संख्या वाढविणे, अधिवासाची माहिती मिळवण्यासाठी विशेष मोहीम, व्यवस्थापनासाठी संस्था आणि स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करून त्यांची मदत घेण्याचा अल्पकालीन उपायांमध्ये भर आहे.

दीर्घकालीन उपायांमध्ये बचाव केंद्राची निर्मिती, बिबट्यांची संख्या नियंत्रित करणे, जुन्नरच्या धर्तीवर विशेष बाब म्हणून समस्येवर उपाय, अन्य ठिकाणचा अभ्यास करून त्या उपाय योजना लागू करण्यावर विचार विनिमय करण्यात आला.

वन्यप्राणी बिबट्याचे जंगलात वास्तव्य अभिप्रेत आहे. परंतु, नागरी वसाहतीलगतच्या ऊस व मक्याच्या शेतांत त्याचा अधिवास तयार होत आहे. बिबट्याची जीवनसाखळी पुढे जाण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे भविष्यात बिबट्यांची संख्या वाढतच जाईल. जुन्नर वनक्षेत्र विभागात असाच प्रश्न उद्भवला होता. त्यांच्याकडून बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्याचा प्रस्ताव पाठविला गेला होता.

नाशिकमध्ये १०० हून अधिक बिबट्यांची संख्या असण्याचा अंदाज वर्तविला जातो. त्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी नर बिबट्यांच्या निर्बिजीकरणाचा पर्याय आहे. असा प्रस्ताव तयार करण्यासाठी वन विभागाकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी बिबट्या-मानवी संघर्षाची माहिती संकलित केली जात आहे. त्यास उपवनसंरक्षक सिध्देश सावर्डेकर यांनी दुजोरा दिला. बिबट्याचा मुक्त संचार हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.

गावोगावी दहशतीचे वातावरण असून त्याचे उद्रेकात रुपांतर व्हायला वेळ लागणार नाही. यावर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी पाऊल टाकले जाणार आहे. – खासदार राजाभाऊ वाजे (नाशिक)