जळगाव : केळीचे दर निच्चांकी पातळीवर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकही मंत्री, खासदार किंवा आमदार पुढे आला नाही. या संदर्भात वृत्त ‘लोकसत्ता’ने गुरूवारी प्रसिद्ध केल्यानंतर अखेर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. त्यात मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांनीही दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.

बर्‍हाणपूर बाजार समितीत १२ ऑगस्टपर्यंत केळीला प्रतिक्विंटल तब्बल १८२५ रुपयांचा कमाल दर मिळत होता. मात्र, त्यानंतर अचानक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन दर कपात सुरू केली. कधी १५००, कधी १३०० तर कधी १२०० असा मनमानी भाव आकारून खेळ करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अपेक्षा होती की, बाजार समितीने फलकावर जाहीर केलेल्या दराप्रमाणे तरी त्यांची केळी खरेदी व्हावी. पण प्रत्यक्षात शेतातून केळी काढणी करतानाच व्यापाऱ्यांनी अजूनही कमी भाव लावला. या सर्व गोंधळामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल तब्बल ५०० ते ६०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. एवढेच नव्हे, तर भाव पाडल्यानंतरही व्यापारी मुद्दाम काढणीसाठी टाळाटाळ करत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

दरम्यान, केळी दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी काही शेतकऱ्यांनी भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांची भेट काही दिवसांपूर्वी घेतली होती. त्यानंतर त्यांनी जळगाव आणि बऱ्हाणपूर जिल्हा प्रशासनाची बैठक आयोजित करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, काही कारणास्तव ती बैठक झालीच नाही. मंत्री महाजन यांनीही नंतर बैठकीचे काय झाले म्हणून विचारणा केली नाही. तेव्हापासून खऱ्या अर्थाने केळी व्यापारी शेतकऱ्यांना लुटताना दिसून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात चार मंत्री, दोन खासदार आणि आठ आमदार आहेत. परंतु, शेतकऱ्यांसाठी कोणाकडेच सध्या वेळ नाही. परिणामी, केळी उत्पादकांची व्यापाऱ्यांकडून सर्रास लूट होत असल्याची टीका शिवसेनेचे नेते (उद्धव ठाकरे) तथा माजी खासदार उन्मेश पाटील यांच्याकडून करण्यात आली.

‘लोकसत्ता’ने देखील केळी दर घसरल्याच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी सविस्तर वृत्त केले. त्यानंतर जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी उशिरा केळी दरप्रश्नी तोडगा काढण्यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तिथे उपस्थित होते. बऱ्हाणपूर येथील काही व्यापारी संगनमत करून मुद्दाम केळीचे भाव पाडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी बऱ्हाणपुरचे जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांच्या निदर्शनास आणल्या गेल्या.

केळी दरप्रश्नी अशा उपययोजनांवर भर

बैठकीत बऱ्हाणपुरचे जिल्हाधिकारी सिंग यांनी तातडीने काही महत्त्वपूर्ण उपाययोजना जाहीर केल्या. केळी लिलाव प्रक्रियेवर यापुढे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवण्यात येणार असून, लिलावांचे यूट्यूब लिंकद्वारे थेट प्रसारण करण्यात येईल. केळीचे बोर्ड भाव जाहीर करताना कमीत कमी २० केळी भाव किमतीची सरासरी काढून बोर्ड भाव जाहीर करण्यात येतील. तसेच बऱ्हाणपूर बाजार समितीच्या बाहेर होणाऱ्या अनधिकृत खरेदी-विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी चेक पोस्ट स्थापन करण्यात येतील.