जळगाव – जनावरांवर आढळून येणाऱ्या विषाणूजन्य लम्पी त्वचा रोगाने जिल्ह्यात हळूहळू पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवडाभरात सुमारे २६५ जनावरांना लम्पीची बाधा झाली असताना, त्यापैकी १२ जनावरांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लम्पीची लक्षणे आढळताच तत्काळ पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुपालकांना केले आहे.

लम्पी त्वचा रोग एक विषाणूजन्य आजार असून तो प्रामुख्याने गाय, बैल, वासरे यासारख्या गाय वर्गातील जनावरांमध्ये आढळून येतो. विशेष म्हणजे लम्पीचा प्रसार डास, माशा, गोचीड, चिलट्यांच्या माध्यमातून जास्तकरून होतो. याशिवाय बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, जखमा किंवा शरीर स्त्रावामधूनही होतो. लम्पी बाधित जनावरांना १०४ ते १०५ अंश सेल्सिअस ताप येतो. त्यांचे खाणे-पिणे कमी होते, अंगावर दोन ते पाच सेंटीमीटरपर्यंतच्या गाठी तयार होतात. पायांना सूज येते आणि जनावर लंगडायला लागते. डोळे व नाकातून स्त्राव येतो. गायींमध्ये दुध उत्पादनात मोठी घट होते. जनावर दगावण्याची सुद्धा शक्यता असते. सद्यःस्थितीत जळगाव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील जनावरांमध्ये लम्पीची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे पशुपालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

२३ जुलैअखेर जळगाव जिल्ह्यात एकूण १६६ जनावरे लम्पी रोगाने बाधित झाली असताना, त्यापैकी सहा जनावरे मृत्युमुखी पडली होती. तर ५० जनावरांमध्ये वेळेवर उपचार झाल्याने सुधारणा दिसून आली होती. दरम्यान, लम्पीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक लसीकरणासह उपचारांवर विशेष भर दिला. प्रत्यक्षात, त्यानंतरही २६ तारखेपर्यंत जिल्ह्यातील लम्पी बाधित जनावरांची संख्या २६५ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी १२ जनावरांचा मृत्यू झाला असून, ६३ जनावरे उपचारानंतर सुधारली आहेत. सद्यःस्थितीत १९० जनावरांवर ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांकडून उपचार केले जात आहेत. लम्पी रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ लसीकरण, बाधित जनावरांचे विलगीकरण, गोठा स्वच्छता आणि कीटकनियंत्रण, या बाबींवर भर देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

जनावरांमध्ये आढळून येणाऱ्या लम्पी रोगाची मणुष्याला कोणतीही लागण होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. दूध उकळून प्यावे. मनात कोणताही संभ्रम बाळगू नये. प्रशासनामार्फत जनजागृती, लसीकरण आणि उपचार मोहिमेला वेग दिला जात आहे. त्यास पशुपालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही काही ठिकाणी प्रातिनिधीक भेटी देऊन लम्पी रोगाचा आढावा घेतला. त्यांच्या सोबत पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड उपस्थित होते.