मालेगाव : खर्चात बचत होईल,असे गोंडस कारण पुढे करत राज्य शासनाच्या विविध खात्यांमध्ये बाह्य यंत्रणांद्वारे (आऊटसोर्सिंग) सेवा घेण्याकडे गेल्या काही दिवसांपासून कल वाढत आहे. आता हे लोण राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयापर्यंत पोहोचले आहे. या विभागातील गट क संवर्गातील एकूण ६८ पदे बाह्य यंत्रणेद्वारे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, मोहिमा व उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे, त्यासाठी सर्व प्रकारच्या शासकीय बातम्या प्रसार माध्यमांद्वारे प्रसारित करण्याची जबाबदारी प्रामुख्याने या विभागाची असते. परंतु गेल्या काही वर्षांपासून या विभागात पदभरती करण्यात उदासीनता दाखविली गेल्याने संचालक, उपसंचालक, जिल्हा माहिती अधिकारी अशा विविध संवर्गातील अनेक पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे कधीकाळी सरकारी बातम्यांचा अक्षरशः रतीब घालणाऱ्या या विभागातील बातम्यांचा ओघ सद्यःस्थितीत कमालीचा रोडावला आहे. मनुष्यबळाअभावी अनेक ठिकाणी या विभागाची कार्यालये केवळ शोभेची झाली असल्याची वस्तुस्थिती निदर्शनास येत आहे. या विभागातील ढेपाळलेले कामकाज सुधारण्यासाठी रिक्त पदे भरण्याऐवजी आता ‘आऊटसोर्सिंग’ पध्दतीने तात्पुरती भरती करुन सेवा उपलब्ध करण्याचा पर्याय शासनाने स्वीकारला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व अधिनस्त कार्यालयांमधील दूरचित्रवाणी छायाचित्रकार, उपसंपादक, तांत्रिक सहाय्यक, प्रतिवेधक, चित्रकार, सहाय्यक दूरचित्रवाणी छायाचित्रकार व कॅमेरा सहाय्यक या सात संवर्गातील ६८ पदांच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्याच्या प्रस्तावास वित्त विभागाद्वारे गठीत उपसमितीने हिरवा कंदील दाखवला होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने अंतिम निर्णय घेतला आहे. दोन वर्षे किंवा नियमित पदे उपलब्ध होणे यापैकी जे आधी घडेल इतक्या कालावधीकरीता बाह्य यंत्रणेद्वारे ही पदे भरण्यात येणार आहेत. बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाची सेवा घेताना या पदांच्या नियमित पद भरतीमध्ये जितका खर्च आला असता, त्या खर्चाच्या कमीत कमी २० ते ३० टक्के इतकी बचत होईल, याची दक्षता घेण्यात यावी, अशी अट या शासन निर्णयामध्ये घालण्यात आली आहे.

बाह्यस्रोत यंत्रणेद्वारे भरती केली जाणारी विविध संवर्गातील रिक्त पदांची संख्या अशी :

  • दूरचित्रवाणी छायाचित्रकार – ९ पदे
  • उपसंपादक – २७ पदे
  • तांत्रिक सहाय्यक – ६ पदे
  • प्रतिवेधक – १४ पदे
  • चित्रकार – ३ पदे
  • सहाय्यक दूरचित्रवाणी छायाचित्रकार – २ पदे
  • कॅमेरा सहाय्यक – ७ पदे