नाशिक – जुने नाशिक आणि पंचवटी यांना जोडणाऱ्या गोदावरी नदीवरील संत गाडगे महाराज पुलाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व सौदर्यीकरणाला अखेर मुहूर्त लाभला आहे. ६८ वर्षांपूर्वी बांधलेल्या या पुलाचे गोदावरीच्या पुरामुळे खांब ठिसूळ होण्याची शक्यता आहे. पुलाचे कठडे आणि स्लॅबचा काही भाग कमकुवत झाला आहे. हे लक्षात घेऊन पुलाचे रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी सुमारे साडेअकरा कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

रामकुंड परिसरातील गोदावरी नदीवरील संत गाडगे महाराज पूल हा कुंभमेळ्यात अतिशय महत्वाचा आहे. सध्याचा पूल आठ मीटर रुंद आणि १७० चौरस मीटर लांबीचा असून तो १९५६-५७ साली बांधण्यात आला होता. पुलाचे खांब दगडी बांधकामात करण्यात आलेले आहेत. दरवर्षी पावसाळ्यात गोदावरी नदीला लहान-मोठे पूर येतात. त्यामुळे पुलाचे खांब पाण्यामुळे ठिसूळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुलाचे कठडे आणि स्लॅबचा काही भाग कमकुवत झाला आहे. अनेक ठिकाणी आतील लोखंड नजरेस पडते. जुने नाशिक-पंचवटीला जोडणाऱ्या या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दीचा विचार करून या पुलाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले.

सिंहस्थ आराखड्यानुसार हे काम प्रस्तावित करण्यात आले. त्यासाठी ११ कोटी ३५ लाख ११ हजार ७९ खर्च गृहीत धरण्यात आला आहे. मनपा आयुक्तांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून कुंभमेळा निधीतून हे काम तत्काळ हाती घेण्याचे निर्देश दिले होते. या पुलाचे काम शासनाकडून निधी प्राप्त होण्याच्या अधिन राहून इ निविदा पद्धतीने करण्याचे महापालिकेने ठरवले आहे. पुलाचे रुंदीकरण, मजबुतीकरण व सौंदर्यीकरणाच्या प्राकलनास नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली.