मालेगाव : मोकाट गायीने हल्ला करून पायदळी तुडवल्याने वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कळवण येथे गेल्या जून महिन्यात घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालेगावात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला. कळवणसारखी दुर्घटना येथे घडू नये म्हणून मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा,असा रेटा लोकांकडून सुरू झाला. मात्र या गंभीर प्रश्नी महापालिका प्रशासन काहीसे ढिम्म असल्याचे दिसत आहे. त्याचे पर्यवसान मोकाट गायीच्या हल्ल्यामुळे शहरातील एका महिलेचा मृत्यू होण्यात झाले आहे. प्रशासकीय सुस्तावलेपणाचा हा बळी असल्याचा ठपका ठेवत यानिमित्ताने संतप्त नागरिकांकडून महापालिकेला ‘लक्ष्य’ केले जात आहे.
सुनंदा नानाजी अहिरे (६२, श्रीकृष्ण कॉलनी, सोयगाव नववसाहत) असे मोकाट गायीच्या हल्ल्यानंतर मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. सुनंदा अहिरे या गेल्या ११ सप्टेंबर रोजीच्या सकाळी नित्यनेमाप्रमाणे पायी फिरण्यासाठी गेल्या होत्या. अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील ६० फुटी रस्त्यावरून त्या जात असताना पाठीमागून आलेल्या एका मोकाट गाईने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या बेशुद्ध पडल्या आणि जागेवरच कोसळल्या. त्या रस्त्यावरून पायी फिरणाऱ्या अन्य नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात त्यांना जबर मार लागला. खांद्याचे हाड तुटल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दरम्यान, शनिवारी त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कळवण येथे भालचंद्र मालपुरे (८५) यांना दोन गाईंनी आधी धडक दिल्यामुळे ते रस्त्यावर पडले. त्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच गाईंनी त्यांना पायदळी तुडवले. यात मालपुरे यांचा मृत्यू झाला. बिथरलेल्या गाईंपासून मालपुरे यांची सुटका करण्यासाठी काही नागरिक धावून गेले होते. त्यापैकी आबा मोरे हे गृहस्थही गाईंच्या हल्ल्यात जखमी झाले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्ह्यातील विविध नगरपालिका व नगरपंचायतींनी मोकाट जनावरांना पकडण्यासाठी मोहिमा सुरू केल्या होत्या. मालेगावात मोकाट जनावरांचा हैदोस ही जूनी समस्या आहे. शहरातील गर्दीच्या व मोक्याच्या ठिकाणी मोकाट जनावरांचे कळप बिनधास्तपणे ठाण मांडून बसल्याचे दृश्य नित्याचे असते. या जनावरांमुळे शहरात यापूर्वी अनेकदा अपघात घडले आहेत. किंबहुना कळवणसारखी दुर्घटना घडू शकते, अशी भीती असल्याने विविध सामाजिक संघटना व जागरुक नागरिकांनी शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, यासाठी पालिकेकडे पाठपुरावा सुरु केला. त्यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली गेली.
लोकांच्या रेट्यानंतर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई करत असल्याचे चित्र महापालिका प्रशासनाकडून निर्माण केले गेले. मोकाट जनावरांच्या मालकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा बडगाही उगारण्यात आला. परंतु,प्रत्यक्षात या कारवाया केवळ कागदावर असल्यागत प्रचिती नागरिकांना वेळोवेळी येत आहे. अत्यंत वर्दळीचा भाग असलेला मोसम पूल, सटाणा रस्ता, संगमेश्वर, कॅम्प रस्ता,जुना आग्रा रोड, कॉलेज रोड, सोमवार बाजार, जुना व नवा बस स्टॅन्ड, डिके चौक, मोतीबाग नाका, एकात्मता चौक अशा विविध भागांत मोकाट जनावरांचे अनेक कळप भटकंती करत असल्याचे दृश्य सातत्याने दिसत असते. या जनावरांपासून बचाव करत वाहनधारक व पादचाऱ्यांवर रस्ता काढताना अनेकदा कसरत करण्याची पाळी येत असते. विशेषतः शाळकरी विद्यार्थी, वृद्ध व महिलावर्ग मोकाट जनावरांच्या समस्येने अधिक त्रस्त झाले आहेत. त्यातच गाईच्या हल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याची वार्ता शहरभर पसरल्यानंतर लोकांच्या संतापात भर पडली आहे.
मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई रोजच केली जात असून यापुढे ती आणखी तीव्र करण्याचा प्रयत्न असणार आहे. परंतु जनावरांची ही संख्या खूप जास्त आहे, हेही वास्तव आहे. संबंधित जनावर मालकांनी जबाबदारीचे भान ठेवत जनावरे रस्त्यावर येणार नाहीत, याची खबरदारी घेणे देखील आवश्यक आहे. – अनिल पारखे (साहाय्यक आयुक्त, मालेगाव महानगरपालिका)
