नाशिक – आरोग्य क्षेत्रातील काम आव्हानात्मक असल्याने या क्षेत्रातील सर्वांनी सकारात्मकता जोपासायला हवी. डॉक्टर आणि रुग्ण, त्यांचे नातेवाईक यामध्ये होणारे कटूप्रसंग टाळण्यासाठी उत्तम संवाद राखणे आवश्यक आहे. तसेच आरोग्य शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीची जोपासना करावी, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

येथे विद्यापीठाचा २२ वा दीक्षांत सोहळा सोमवारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या शिक्षक प्रशिक्षण प्रबोधिनीत झाला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे शासनाकडे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शासन आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम राबवते. समाजहिताच्या या उपक्रमांमध्ये तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदविला पाहिजे. स्वतःच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहाराची गरज त्यांनी मांडली.

हेही वाचा >>> नाशिक : चाळीस जणांची काळजी करु नका; गिरीश महाजन यांचा अजित पवार यांना सल्ला

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय आरोग्य विज्ञान विद्यालयाचे प्रा. डॉ. भूषण पटवर्धन यांनी सध्याच्या जीवनशैलीमुळे आजारांचे प्रमाण वाढत असल्याकडे लक्ष वेधले. पाश्चिमात्यांचे अंधानुकरण केल्याने त्यांच्या चांगल्या सवयी न घेता अयोग्य गोष्टी घेतल्यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्वच उपचार पध्दतींतील वेगवेगळया गोष्टींचा समुच्चय करुन समाजाला या आजारांवर मात करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. सोहळ्यात १७ विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवीने तर विविध विद्याशाखेतील ९६ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या संख्येत वाढ

विद्यापीठाचे वैद्यकीय पदव्युत्तर पदवी व संशोधन संस्थेत ५२ विद्यार्थी प्रवेशित झाले असून यामुळे नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची संख्या वाढली आहे असे विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले. रौप्य महोत्सवी वर्षात विद्यापीठाची वाटचाल तंत्रज्ञान व प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. विद्यापीठाने विविध संस्थासमवेत सामंजस्य करार केले आहेत. परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करुन ऑनलाईन पध्दतीने गुणांकन करण्यात येते. यामुळे निकाल घोषित करण्यासाठी लागणाऱ्या वेळेची बचत झाली. वैद्यकीय शिक्षण व संशोधनाकरीता चेअर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दूर्गम भागातील लोकांची आरोग्य सेवा व त्याबाबत कार्य करण्यासाठी ‘ब्लॉसम’ उपक्रमाची सुरवात विदर्भात करण्यात आली असून नाशिक जिल्हयात त्याचा प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवयवदान, रक्तदान आदीबाबत विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात, असे त्यांनी नमूद केले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister girish mahajan at the 22nd convocation of muhs in nashik zws