धुळे: राज्याचे पणन आणि जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री सौ. नयनकुंवरताई रावल यांनी दोंडाईचा-वरवाडे नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पारंपरिक प्रतिद्वंद्वी असलेले रावल आणि डॉ. देशमुख गट एकत्र आले हे चौथ्या उमेदवारी अर्ज दाखल करतानाचे वैशिष्ट्य आहे.

याआधी सौ. नयनकुंवरताई रावल यांनीतीन वेळा नगराध्यक्षपद भूषविले आहे. यावेळी अर्ज दाखल करताना प्रचंड शक्तिप्रदर्शन झाले. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी राजकीय एकजूट दिसून आली. चौथ्यांदा नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करणाऱ्या सौ. रावल यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रम संपूर्ण शहरात लक्षवेधी ठरला.

काल सकाळी शिवमंदिरात पूजा करून उमेदवारांनी मिरवणुकीला प्रारंभ केला. मंत्री जयकुमार रावल, रावल उद्योग समूहाचे चेअरमन सरकारसाहेब रावल, धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल, माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख, माजी महापौर प्रदीप कर्पे, भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, शहराध्यक्ष जिंद्र गिरासे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सौ. नयनकुंवरताई रावल म्हणाल्या की, आपण यापूर्वी तीन वेळा नगराध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. यामुळे शहरातील समस्या आणि आवश्यक कामे कोणती हे आपल्याला ठाऊक आहे. दोंडाईचा शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे. भुयारी गटारी प्रकल्प, नाट्यगृह, वॉटर पार्क, सायन्स पार्क, अत्याधुनिक अग्निशमन केंद्र, कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने, भाजीमार्केट आणि खाऊ गल्ली अशी अनेक विकासकामे आपण करू शकतो. ही सर्व कामे करण्याचा आपला संकल्प आहे.

मंत्री जयकुमार रावल यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की धुळे जिल्हा हा भाजपाचा बालेकिल्ला असून सर्व नगरपरिषदांमध्ये भाजपाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित होणार आहे. दोंडाईचा नगरपरिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीत सर्व २७ जागांवर भाजपाचा विजय होईल.  माजी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र देशमुख म्हणाले की, रावल आणि देशमुख गटातील गेल्या ४० वर्षांचा राजकीय संघर्ष आता समाप्त झाला आहे.

गेल्या दहा वर्षांत दोंडाईचा शहराचा विकास वेगाने होत असल्याने पुढील पिढीत संघर्ष न राहता एकजुटीने शहराचा विकास व्हावा, या उद्देशाने दोन्ही गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाआहे.दोंडाईचा नगरपरीषद निवडणुकीत भाजपाची भव्य शक्तीप्रदर्शनात उमेदवारी दाखल झाल्यामुळे शहरातील निवडणूक वातावरण अधिकच तापले आहे.