काही दिवसांपूर्वी धुळ्यात कुख्यात गुंड रफियोद्दीन शेख उर्फ गुड्ड्या याची हत्या झाल्यानंतर शहरात निर्माण झालेला तणाव अद्यापही निवळलेला नाही. त्याच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी गुड्ड्याच्या समर्थकांकडून मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा तिरंगा चौकात आल्यानंतर हिंसक झाला. या मोर्चात सहभागी झालेल्या काहीजणांनी येथून जाणाऱ्या एका बसवर दगडफेक केली. तसेच बसवर ज्वलनशील पदार्थ टाकून जाळपोळीचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच याठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रफियोद्दीन शेख उर्फ गुड्डया हा धुळ्यातील कुख्यात गुंड होता. कराचीवाला खुंटाजवळील गोपाल टी हाऊस येथे मंगळवारी त्याची एका टोळक्याकडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. इंडिका कार आणि दुचाकीवरुन आलेल्या ८ ते १० जणांच्या टोळक्याने गुड्ड्याला भररस्त्यात मारहाण करुन त्याची हत्या केली होती. या घटनेची सीसीटीव्हीतील दृश्ये सोशल मीडियावर व्हायरलही झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून गुड्ड्याच्या हत्येचा कसून तपास सुरू आहे. जवळपास सर्वच मारेकरी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी फारुक फौजी याने दिलेल्या फिर्यादीनुसार विलास गोयर, विजय गोयर, विक्की गोयर, शाम गोयर, राजा उर्फ भद्रा देवर, भीमा देवरे, यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या चार दिवसांपासून पोलीस दिवस-रात्र आरोपींचा शोध घेत आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची ५ पथके तयार करण्यात आली आहेत. या संपूर्ण घटनेची ‘क्लिप’ सर्वच ठिकाणी व्हायरल झाली आहे. ती यू-ट्यूबवरही जाऊन पोहोचली आहे. यामुळे शहरात काहीप्रमाणात तणाव कायम आहे.

मनपा जळीतकांडासह गुड्डयावर एकूण ३५ गुन्हे
धुळ्यातील देवपूर परिसरातील रहिवासी असलेला रफियोद्दीन शेख उर्फ गुड्डया हा सुरुवातीला छोट्या मोठ्या चोर्‍या करायचा. यानंतर तो सराईत चोरटा झाला. त्याला अनेक वेळा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, कायद्याचा शिताफीने वापर करीत तो बाहेर यायचा. धुळे महापालिकेच्या वसुली विभागाचे शाळा क्र. १ मधील दस्तावेज रेकॉर्ड त्याने मनपातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या इशार्‍यावरुन सुपारी घेवून जाळल्याचे आरोप त्याच्यावर होते. या प्रकरणात गुड्डयाला अटक देखील झाली होती. त्या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून त्याच्यावर खटलाही चालू आहे. याशिवाय, साक्री रोडवर नगरच्या व्यापार्‍याचा खून, स्वतःच्या साथीदारावर गोळ्या झाडण्याचा प्रकार, कोपरगाव, मनमाड, नाशिक आदी ठिकाणी दरोडे, चोर्‍या ब्लॅकमेलिंग असे एकुण ३५ गुन्हे गुड्डयावर दाखल होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mob trying to burn bus in dhule after goon killed butchered