नाशिक – शहर परिसरासह दिंडोरी तालुक्यात गुरुवारी सलग दोन वेळा जोरदार स्फोटासारखे आवाज होऊन बसलेले हादरे भूकंपाची घटना नाही. तर तो सुखोई लढाऊ विमानांच्या ‘सॉनिक बूम’चा आवाज असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका पाठोपाठ एक दोन वेळा जोरदार आवाज होऊन तावदानांना झटके बसले. पोलीस व प्रशासकीय यंत्रणेच्या पडताळणीत अखेर सॉनिक बूमवर शिक्कामोर्तब झाले.

गुरुवारी सकाळी ११ ते पावणेबाराच्या दरम्यान दिंडोरीसह आसपासच्या भागात कानठळ्या बसवणारे स्फोटासारखे आवाज ऐकू आले. १५ ते २० किलोमीटरच्या परिघात आवाजाने काही घरांची काचेची तावदाने फुटल्याचे सांगितले जाते. शहरात आवाज व हादरे जाणवले. कुठेतरी भूकंपाचे धक्के बसल्याची चर्चा सुरू झाली. महसूल व पोलीस यंत्रणेने त्याचा माग काढण्यासाठी मेरीसह एचएएलशी संपर्क साधून माहिती घेतली. तेव्हा तो सुखोई लढाऊ विमान मार्गक्रमणावेळी झालेला सॉनिक बूमचा आवाज असल्याचे निष्पन्न झाले.

नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. आवाजाच्या धक्क्यांनी काही मालमत्तेचे नुकसान झाले आहे का, याची चौकशी करण्याची सूचना सर्व तलाठ्यांना करण्यात आल्याचे दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत कुठल्याही नुकसानीची माहिती मिळालेली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेतील भूकंपमापन केंद्रावर कुठल्याही भूकंपाची नोंद झालेली नाही. या केंद्रानेही हे आवाज सोनिक बूम वा, इतर काही कारणांनी झाल्याची शक्यता वर्तविली. ओझरस्थित हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएल कारखान्यात सुखोई लढाऊ विमानांच्या संपूर्ण देखभाल दुरुस्तीचे (ओव्हरऑल) काम चालते. दुरुस्तीनंतर विमानाच्या हवाई चाचण्या घेतल्या जातात. तेव्हा हा प्रकार घडल्याचा अंदाज आहे.

सॉनिक बूम म्हणजे काय ?

सध्याची बहुतांश आधुनिक लढाऊ विमाने ध्वनीहून अधिक वेगाने (सुपरसॉनिक गती) मार्गक्रमण करतात. सुखोई त्यापैकीच एक आहे. प्रारंभी सर्वसाधारण वेगात विमान आकाशात झेपावून विशिष्ट उंची गाठल्यानंतर ती ध्वनीहून अधिक वेग पकडतात. तेव्हा वातावरणात घर्षणाने हादरे बसून तरंग उमटतात. प्रचंड आवाज होतो. वेग बदलण्याचा घटनाक्रम ‘सॉनिक बूम’ म्हणून ओळखला जातो. वेग बदलण्याची प्रक्रिया कमी उंचीवर घडली तर आवाज आणि हादऱ्यांची तीव्रता कित्येक पटीने वाढते. भूकंपाचे धक्के बसल्याचा भास होतो. भीतीचे वातावरण तयार होते. लढाऊ विमानांची निर्मिती व दुरुस्ती करणाऱ्या एचएएलच्या बंगुळुरू आणि नाशिक प्रकल्पाच्या हवाई क्षेत्रात सॉनिक बूमचे आवाज अधुनमधून कानी पडतात.

आवाजाची तीव्रता का वाढली…

लढाऊ विमाने ध्वनीहून अधिक वेगाने मार्गक्रमण करताना जमिनीवर सॉनिक बूम ऐकू येतो. हा वेग समुद्र सपाटीपासून साधारणत ७६० मैल प्रतितास असतो. मात्र, तापमान, उंची व परिस्थितीतीनिहाय काही बदलही संभवतात असे कांग्रेशनल संशोधन संस्थेचे निरीक्षण आहे. नासाच्या म्हणण्यानुसार हवेत वेगाने भ्रमंती करताना विमान वातावरणातील रेणू शक्तीने बाजुला सारते, त्यामुुळे हादरे बसून ध्वनीलहरींची लाट तयार होते. एका संशोधनानुसार कमी उंचीवर ही लाट तयार झाल्यास जमिनीवरील लोकांना त्याचा मोठा आवाज ऐकू येतो. गुरुवारी नाशिकमध्ये यापेक्षा वेगळे काही घडले नाही.