नाशिक : शहर बससेवा असलेल्या सिटीलिंकची अपघातांची मालिका सुरुच असून बुधवारी रात्री पंचवटीतील क. का. वाघ महाविद्यालयाजवळ चालकाचा ताबा सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. अपघातामुळे चालकांच्या वाहन चालविण्याच्या कार्यशैलीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सिटीलिंक काही वर्षांपासून शहर परिसरात सेवा देत आहे. दोनशेपेक्षा अधिक बस नाशिक शहराच्या विविध मार्गांवरून धावत असतांना सिन्नर, दिंडोरी, त्र्यंबकेश्वरपर्यंत सिटीलिंक बससेवेचा विस्तार झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या स्पर्धेत सिटीलिंक बस उतरत असतांना चालकांच्या गाडी चालविण्याच्या धोकादायक शैलीमुळे सिटीलिंक बससेवा सुरूवातीपासून चर्चेत राहिली आहे. राज्य परिवहन महामंडळातील काही कर्मचारी, काही शिकाऊ चालक यांना सिटीलिंक बससेवेसाठी चालक म्हणून सेवा देण्यात आली आहे. संबंधितांना प्रशिक्षण दिल्याचा दावा होत असला तरी बऱ्याचदा वर्दळीच्या ठिकाणी चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होतांना दिसते. वाहनांना खेटूून बस नेणे, सिग्नलचे नियम न पाळणे, थांब्यावर न थांबणे, बसचा अतीवेग, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे सिटीलिंकचे अपघात झाले आहेत.
दोन दिवसांपूर्वी सिटीलिंकच्या धडकेने चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले होते. बुधवारी मध्यरात्री क. का. वाघ महाविद्यालयाकडून तपोवनाकडे जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे बस उड्डाणपुलाखालील महामार्गाने जात असताना संरक्षक जाळ्यातून थेट सर्व्हिस रस्त्यावर आली. बसमध्ये केवळ वाहक आणि चालक होते. अपघातात बसच्या समोरील बाजूचे नुकसान झाले असून चालकास मार लागला आहे. अपघाताची माहिती अमृतधाम येथील अग्निशमन विभागीय केंद्राला मिळताच जवानांनी बंबासह घटनास्थळी धाव घेतली. चालकाला सुखरूप बाहेर काढले. पंचवटी तसेच आडगाव पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत झालेल्या प्रकाराची नोंद घेतली.