नाशिक – शिक्षक दिन नाशिकसह संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. सामाजिक संस्था व संघटनांकडून शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. नाशिक महानगरपालिकेच्यावतीने आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले. शिक्षक अर्थात गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त होत असताना राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी देखील हा दिवस वेगळ्या धाटणीने साजरा केला. आपल्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या भेटीची छायाचित्रे समाज माध्यमातून प्रसारित करीत भावना मांडली.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून शहर व परिसरात विविध उपक्रम राबविले गेले. शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेतर्फे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सात शिक्षक व पाच मुख्याध्यापकांची आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी निवड झाल्याची घोषणा केली. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पीसीसीडीए, संदीप विद्यापीठ आणि पुण्याच्या दी युनिक अकॅडमीतर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या सोहळ्यात जिल्ह्यातील १३ शिक्षकांना गौरविण्यात आले. यामध्ये लिना ठाकरे, प्रज्ञा पगार, स्वप्नील कदम, योगेश आसावा, जागृती पाटील, मंगेश चौधरी, श्रीहरी मोकळ, आदितीदेव शेजवळ, मुहम्मद जुनैद, निकेश खोतकर, भूषण विसपुते, भानुदास आभाळे, रश्मी देशपांडे, धनश्री देवरे या गुणवंत शिक्षकांचा समावेश आहे. यावेळी प्राचार्य पंकज धर्माधिकारी, तुकाराम जाधव, कपिल हांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी प्रास्ताविक केले.

शिक्षक दिनी अनेकांनी शिक्षकांप्रती विविध माध्यमांतून आदरभाव व्यक्त केला. यात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा देखील समावेश होता. शिक्षक दिनी त्यांनी ‘पहिल्याच दिवशी शाळेत जायचे नाही म्हणून रडणाऱ्या पोटच्या गोळ्याला शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बखोटं धरून शाळेत येऊन, मास्तर याले हाणी मारीसन का होईना पण चांगला तयार कर’ असे कठोरपणे सांगणाऱ्या आईची आठवण कथन करीत ‘अन् तेवढ्याच कडक शिस्तीने आपल्या या शिष्याला शिस्त आणि शाळेची गोडी लावणाऱ्या शिक्षकांचा हा शिष्य पुढे या महाराष्ट्राचा शिक्षणमंत्री होतो… किती भाग्यवान ते गुरू आणि किती तो आदर्श शिष्य, की जो आज सुद्धा आपल्या प्राथमिक शिक्षणाचा पाया भरणाऱ्या या गुरुंची आस्थेने भेट घेत असतो. आणि आदराने चौकशी करीत वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून चरणी नतमस्तक होत असतो… धन्य ते गुरुजी आणि धन्य तो शिष्य… अशी भावना मांडत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरु-शिष्यांकडून सर्व शिक्षकांना विनम्र अभिवादन केले आहे.

शिक्षणमंत्री दादा भुसे हे कसमादे पट्ट्यातील आहेत. या भागात अहिराणी ही भाषा बोलली जाते. आईने शिक्षका्ंना केलेली सूचनावजा विनंती याच अहिराणीतील असून ‘मास्तर याला हाणले तरी चालेल, पण चांगला तयार कर’ असा त्याचा अर्थ असल्याचे भाषा तज्ज्ञ सांगतात.