नाशिक : जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात कासारी गावाजवळ चांदेश्वरी धरणाच्या परिसरात गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक बसली. या अपघातात नांदगाव तालुक्यातील कासारी येथील दोघा भावंडांचा मृत्यू झाला. तर, एक जण जखमी आहे. जिल्ह्यात आठवड्यापेक्षा अधिक दिवसांपासून गायब झालेल्या पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रिमझिम तर, कुठे मुसळधार असे त्याचे स्वरुप आहे.

पाऊस थांबल्याने ठिकठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु, पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने या खड्ड्यांमधील बारीक माती, खडी बाहेर आली आहे. या खडीवरुन दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही अशीच परिस्थिती आहे.

रस्त्यांच्या या बिकट अवस्थेमुळे नांदगाव तालुक्यातील कासारी या गावाहून तालुक्यातीलच कुसुमतेल (बोलठाण) या गावाकडे एकाच दुचाकीवरुन जाणारे राहुल बाळू खोडके ( २६ ), रोहित बाळू खोडके ( २१ ) हे दोघे भाऊ आणि त्यांच्यासमवेत असलेला त्यांचा मित्र समाधान गोरख मेंगाळ ( २५ ) हे तिघे सावध होते. सावधपणे दुचाकी चालवित ते नांदगावजवळील चांदेश्वरी घाटात आले असता छत्रपती संभाजीनगरकडून मनमाडकडे जात असलेले मालवाहू वाहन समोरुन आले. या वाहनाची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात राहुल आणि रोहित या खोडके बंधुंचा जागीच मृत्यु झाला. समाधान मेंगाळ हा गंभीर जखमी झाला. अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातातील जखमी समाधान मेंगाळ यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

राहुल आणि रोहित हे दोघे मूळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील तरुण. सध्या ते कासारी येथे राहत होते. समाधान मेंगाळही कासारी येथेच राहतो. नांदगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या भीषण अपघातात दोन तरुण भावंडांचा मृत्यू झाल्याने कासारी येथे हळहळ व्यक्त होत आहे. चांदेश्वरी घाट हा अरुंद आहे. या घाटात याआधीही अपघात झाले आहेत. चांदेश्वरी घाटाची दुरुस्ती करण्याची आणि त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. परंतु, शासन आणि प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी, घाटात अपघात होणे नित्याचे झाले आहे. पावसाळ्यात या घाटातील प्रवास अधिक धोकादायक होतो. या अपघातानंतर तरी प्रशासनाला जाग येईल काय, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.