नाशिक – दीड वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिलेल्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात पारदर्शकता, वेग आणि गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने कुंभमेळ्याशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या संबंधित सर्व कामांचे, उपक्रमांचे छायाचित्र आणि चित्रीकरण करण्याचे आदेश नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. कुंभमेळ्याच्या कोट्यवधींच्या कामांत क्लब टेडरिंग करून स्थानिकांना डावलले, मोठ्या स्वरुपातील कामे गुजरातसह काही विशिष्ट ठेकेदारांना दिल्याचे आरोप वारंवार होत आहेत. या घटनाक्रमात प्राधिकरणाने हे आदेश सर्व यंत्रणांना दिले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासकीय यंत्रणांकडून हजारो कोटींची कामे हाती घेतली जात आहे. यामध्ये रस्ते, पूल, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पाणी पुरवठा योजना अशा अनेक कामांचा समावेश आहे. पाऊस निरोप घेण्याच्या मार्गावर असताना ही कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. कुंभमेळ्याची अनेक छोटी, छोटी कामे एकत्रित करून एकत्रित निविदा काढल्या. जाचक अटी, शर्ती टाकून स्थानिक ठेकेदारांना डावलल्याची तक्रार बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या नाशिक शाखेसह ठेकेदारांच्या संघटनांनी केली होती.
मोठ्या स्वरुपातील ही कामे गुजरातच्या कंपन्या व कंत्राटदारांना दिली गेल्याचे आरोप संबंधितांनी केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने १४०० कोटींची कामे ठराविक कंत्राटदारांना दिली. महानगरपालिकेने तीच कार्यपद्धती अनुसरल्याकडे ठेकेदार संघटनांकडून लक्ष वेधले गेले. यावर मध्यंतरी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी कामांचे एकत्रिकरण अर्थात क्लब टेंडरिंग करावे लागल्याची कबुली दिली. परंतु, गुजरातच्या ठेकेदारांना कामे दिल्याचा आक्षेप फेटाळला होता.
कुंभमेळा कामांच्या निविदांवरून ठेकेदार संघटना नव्हे तर, सत्ताधारी शिवसेनेकडून (एकनाथ शिंदे) संशय व्यक्त केला जात आहे. या घटनाक्रमात कुंभमेळा प्राधिकरणाचे कामांची गुणवत्ता, दर्जा राखण्यासाठी हे आदेश आले आहेत. त्यानुसार सर्व यंत्रणांना कामे सुरू होण्यापूर्वी, छायाचित्र व चित्रीकरण बंधनकारक केले आहे. यासाठी भ्रमणध्वनी कॅमेरा, चित्रीकरण कॅमेरा किंवा थेट ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करावा. काम सुरू झाल्यानंतर पूर्ण होण्याच्या आत किमान तीनवेळा सद्यस्थिती दर्शविणारे चित्रिकरण व काम पूर्ण झाल्यावरही ते करावे लागेल. या चित्रीकरणावेळीच किंवा त्याच्या एक-दोन दिवस मागेपुढे अधिकाधिक जिओ टॅग आणि वेळेचा उल्लेख होईल, असे छायाचित्र काढावीत.
इमारतीचे स्लॅब टाकणे वा रस्त्याचे डांबरीकरण सारख्या कामावेळी दर्जा, गुणवत्ता दिसणाऱ्या भागांचे छायाचित्र काढण्याचे निर्देश दिले गेले आहेत. या सर्व चित्रफिती व छायाचित्र योग्य प्रकारे जतन करावे. जिथे कामांचे छायाचित्र वा चित्रफिती काढणे शक्य नाही, तिथे संबंधित पुरवठादारांकडून प्राप्त झालेल्या मालाचा दर्जा, गुणवत्ता, स्पेसिफिकेशन्स आदी दिसतील, याप्रकारे चित्रीकरण व महत्वाची छायाचित्रे काढण्याचे निर्देश प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.