नाशिक – सातपूरमधील महादेव वाडी भागात बुधवारी झाड तोडत असताना ‘ट्री कटर‘ यंत्रासाठी आणलेल्या इंधन कॅनवरून वाहन गेल्यामुळे अकस्मात आगीचा भडका उडाल्याची घटना घडली. यामध्ये दोन महिलांसह आसपासचे पाच ते सहा जण भाजून जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीच्या कारणाबाबत परस्परविरोधी अंदाज व्यक्त होत आहे.
सातपूर गावातील मटण मार्केट जवळील महादेव वाडी भागात दुपारी बारा वाजेता ही घटना घडली. या परिसरात झाड तोडण्याचे काम सुरू होते. वृक्ष प्राधिकरण विभागाने नियुक्त केलेल्या ठेेकेदाराकडून हे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. झाडे तोडण्यासाठी पेट्रोलवर चालणाऱ्या ट्री कटर अर्थात झाड कापणी यंत्राचा वापर केला जात होता. हे यंत्र पेट्रोलवर चालते. त्यासाठी आणलेले पेट्रोल बाजुला एका कॅनमध्ये ठेवलेले होते. शेजारी ठेवलेल्या पेट्रोल कॅनवरून वाहन गेल्यामुळे ती फुटली आणि ठिणग्या उडून आगीचा भडका उडाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यास वृक्ष प्राधिकरण विभागाचे प्रमुख विवेक भदाणे यांनी दुजोरा दिला.
मटण मार्केटजवळील महादेव वाडी हा निवासी भाग आहे. आगीच्या भडक्यात रस्त्यावरून जाणारे पाच ते सहा जण जखमी झाले. आगीचा भडका उडाल्याने परिसरात एकच धावपळ उडाली. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला कळवण्यात आली. दरम्यानच्या काळात अग्निशमनचे पथक व मनपाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. आगीच्या भडक्यात सोनू गाडेकर, लताबाई दोबाडे, कैलास दोबाडे, सुरेश दोबाडे, दुर्गा दोबाडे हे जखमी झाल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. त्यांना तातडीने प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय परिसरात स्थानिक नागरिक व जखमींच्या कुटुंबियांची मोठी गर्दी झाली होती.
परस्परविरोधी अंदाज
आगीच्या कारणांबाबत परस्परविरोधी अंदाज व्यक्त होत आहे. यंत्राद्वारे झाड कापताना आगीच्या ठिगण्या उडतात. जेव्हा इंधनाची कँन फुटली, तेव्हा ठिणग्या उडून आगीचा भडका उडाल्याचा काहींचा अंदाज आहे. तर अग्निशमन विभागाच्या पथकाने कुणीतरी बीडी पीत असल्याने आगीचा भडका उडाल्याचा अंदाज वर्तविला. वृक्ष प्राधिकरण विभागाने इंधनाच्या कॅनवरून कुणीतरी वाहन नेल्याने ती फुटून आगीचा भडका उडाल्याचे म्हटले आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात नेल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.