नाशिक : वाहतूक कोंडीच्या कचाट्यात सापडलेल्या द्वारका चौकात प्रस्तावित भुयारी मार्ग आणि उड्डाण पुलाखालील अन्य चौकातील कामे आता कुंभमेळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. ही कामे सिंहस्थापर्यंत पूर्णत्वास जाणे अशक्य आहे. नाहक रस्ते खोदणे योग्य नाही. त्यामुळे ती सिंहस्थानंतर करण्याची सूचना राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कुंभमेळ्याची आढावा बैठक मंत्री भुजबळ यांच्या अध्यतेखाली पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा,पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कुंभमेळा प्राधिकरणाचे कागदोपत्री बरेचसे काम झाले आहे. सिंहस्थाची काही कामे मंजूर असून काहींना मंजुरी मिळणे बाकी आहे. पावसाळा संपताच ती सर्व सुरू व्हायला हवीत. ही कामे रेंगाळली तर, अडचणी येऊ शकतात. कुंभमेळापर्यंत म्हणजे पुढील दीड ते पावणेदोन वर्षात पूर्ण न होऊ शकणारी कुठलीही नवीन कामे यात समाविष्ट करू नयेत, असे भुजबळ यांनी सूचित केले. यावेळी द्वारका चौकासह अन्य कामांचाही त्यांनी उल्लेख केला.

शहरातील अनेक भागांना जोडणारा मुंबई-आग्रा आणि नाशिक-पुणे महामार्गावरील द्वारका हा मुख्य चौक आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना तो ओलांडणे जिकिरीचे ठरते. या चौकातील स्थितीवरून मध्यंतरी भुजबळ यांनी पोलीस व महापालिकेला धारेवर धरले होते. द्वारका चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाने भुयारी मार्गाचा आराखडा तयार केेला आहे. चौकात द्वारका चौकातून नाशिकहून नाशिकरोडकडे जाताना ८०० मीटरचा भुयारी मार्ग तयार केला जाईल. त्यामुळे या मार्गावरील हलकी वाहने ये-जा करू शकणार आहे. या मुख्य भुयारी मार्गाला धुळ्याकडे जाणारी वाहतूक जोडली जाईल. वडाळा नाका येथे ३०० मीटरचा दुसरा भुयारी मार्ग विकसित् करण्यात येणार आहे.

कुंभमेळ्याआधी ही कामे पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे ती कुंभमेळ्यानंतर करण्याची सूचना भुजबळ यांनी केली. यामुळे द्वारका चौकासह उड्डाण पुलाखालील अन्य चौाकातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कुंभमेळ्यानंतर कायमस्वरुपी तोडगा निघू शकेल. तोपर्यंत वाहतूक सुरळीत राखण्यासाठी वाहतूक पोलीस, महापालिकेला नियोजन आणि वाहनधारकांना स्वयंशिस्तीचे पालन करावे लागणार असल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.