मालेगाव : शेतकऱ्यांच्या भावना दुखावणारी विधाने आणि विधानभवनात ऑनलाइन रमी खेळण्याच्या घटनेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मालेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्त्यांचा प्रतिकात्मक जुगार खेळत निषेध करण्यात आला. कृषिमंत्र्यांचा तातडीने राजिनामा घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने वादग्रस्त विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी विधानभवनात चाललेल्या चर्चेत सहभागी न होता ते ऑनलाइन रमी खेळण्यात दंग असल्याचे समोर आले. ही बाब अत्यंत निंदनीय आणि शेतकऱ्यांच्या भावनांचा अनादर करणारी आहे. एकीकडे दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करत असताना राज्याचे कृषिमंत्री दुसरीकडे रमी खेळण्यात मग्न राहत असल्याने राज्यात एवढा असंवेदनशील कृषिमंत्री कसा राहू शकतो, असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला.

यावेळी पक्षाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार पंकज पाटील यांना निवेदन देण्यात आले. कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त वर्तन, शेतकरीविरोधी त्यांची भूमिका याकडे मुख्यमंत्र्यांनी डोळेझाक करणे, हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे नमूद करत कोकाटे यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा आणि संवेदनशील अशा व्यक्तीकडे कृषिमंत्री पदाचा पदभार सोपवावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. या आंदोलनात पक्षाचे शहर अध्यक्ष सलीम रिजवी, तालुका अध्यक्ष संदीप पवार, दिनेश ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे अनिल वाघ,अशोक निकम,प्रकाश वाघ,शाबान तांबोळी, शेखर पवार,भाऊसाहेब पवार आदी उपस्थित होते.