धुळे – बारीपाडा हे नाव घेतले की आपोआपच पद्मश्री चैत्राम पवार हे नाव पुढे येते. बारीपाडा आणि चैत्राम पवार हे समीकरण इतके रुळले आहे की, जणूकाही चैत्राम पवार यांनीच हे गाव वसवले आहे की काय, असे वाटावे. संपूर्ण देशात प्रसिध्द झालेले हे एक छोटेसे गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यास कारणही तसेच आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात बारीपाडा हे छोटेसे गाव आहे. पूर्वी हे गाव सर्वचदृष्टीने मागास होते. गावात काम नसल्याने अनेकांचे स्थलांतर ठरलेले असे. अशा या गावात चैत्राम पवार या युवकाने बदल घडवून आणला. त्यांच्या या प्रयत्नांना वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची साथ मिळाली. गाव परिसरातील जंगल वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, मुळ्या आणल्या तरी दंडात्मक कारवाई, राखीव जंगलात बैलगाडी नेऊ नये, पहारेकऱ्यामार्फत देखरेख अशा उपाययोजना केल्या. या प्रयत्नांमुळे सुमारे ११०० एकरचे जंगल गावाने तयार केले. जल, जंगल आणि जमीन हा संदेश बारीपाड्याने दिला.
बारीपाड्याने गावातील महिला, युवक यांना रोजगार मिळावा म्हणून वेगवेगळे उपक्रम सुरु केले. वनभाजी महोत्सव हा त्यापैकी एक. या महोत्सवात दोनशेपेक्षा अधिक रानभाज्या असतात. यंदा २८ सप्टेंबर रोजी बारीपाड्यात वनभाजी स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आदिवासीबहुल ६० गावांमधील ८१६ महिलांनी नोंदणी केली आहे.
यामुळे खास आदिवासी महिलांसाठी असलेली ही स्पर्धा यंदाही चांगलीच रंगणार आहे. पद्मश्री चैत्राम पवार यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून जैवविविधता संरक्षण समितीतर्फे ही स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या या वनभाजी स्पर्धेची महती केवळ राज्यपातळीवरच नाही, तर देश-विदेश पातळीवरही चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय ठरली आहे. दरवर्षी स्पर्धकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे वनभाजी स्पर्धेचे महत्व वाढले आहे.
बारीपाड्यासह पंचक्रोशीतील २२ गावांनी वन विभागाच्या सहकायनि उत्तमरित्या वन संरक्षण केले आहे. त्यात पिंपळपाडा , मोहगाव, चावडीपाडा, शेंदवड, मांजरी, विजरपूर, धामणदर, मंडाणे, मापलगाव, कालदर या गावांनी वैशिष्टपूर्ण योगदान दिले आहे. बारीपाड्याच्या दक्षिणेस घनदाट जंगल असून ते घोड्याच्या नालीच्या आकारात आहे.
कॅनडास्थित डॉ.शैलेश शुक्ल हे पीएच. डी.साठी बारीपाड्यात वास्तव्यास होते. त्यांच्या संकल्पनेतून २००४ पासून वनभाजी पाककला स्पर्धा सुरु झाली. ते कॅनडात मोनोटोवा विद्यापीठात प्राध्यापक आहेत. अबोल, लाजऱ्या, बुजऱ्या आदिवासी महिलांना बोलके करुन पाककलेचे ज्ञान पुढच्या पिढीकडे संक्रमित करणे, हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे.
स्पर्धेतील महिला जंगलातील औषधी व विविध भाज्या जशा आळींब, ओवा, बाफळी, बांबू कोंब, कडव्या, हलूदा, केळ भाजी, कोहळा, चंदका, चित्रक, देवारी, गोगल, गोमठ, जंगलीचुच, मेका, मोखा, नागूळद, रजगिरा, रानतुळस, सोनारु, सोलव्या निंबू, शिरीसफुल, तुराठा, उळशी, वनदोडका, वनस्पतीच्या मुळ्या, पाने, फुले, खोड, फळ, साल, बी, कंद आदी ११५ ते ११७ प्रकारच्या भाज्यांचा समावेश करतात. वाफेवर अथवा पाण्यात, कमी तेलात चुलीवर भाज्या केल्या जातात. या अनुषंगाने स्पर्धेचे, आदिवासी महिलांचे आणि पर्यायाने गाव, जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे.