नंदुरबार – राज्यात सर्वाधिक बालविवाहाची संख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी आता पोलीस दल पुढे सरसावले आहे. महिला दिनाचे औचित्य साधत बुधवारी पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता ही योजना सुरु केली. या योजने अंतर्गत गावपातळीवर विविध घटकांचा समावेश असलेल्या पथकाद्वारे जनजागृतीसह बालविवाह रोखण्याचे काम केले जाणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात महिला दिनानिमित्त महिला गौरवाचा जागर होत असतांनाच पोलीस दलाने नंदुरबार जिल्ह्यातील महिलांच्या सन्मानासाठी आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. राज्यात कुपोषणासह सर्वाधिक बालविवाह होणारा जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख. एका आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात नंदुरबार जिल्ह्यात नऊ हजारांहून अधिक बालविवाह झाले आहेत. परंतु, शासकीय स्तरावर कारवाईचा आकडा वर्षभरात केवळ १५ ते २० असा आहे.

हेही वाचा >>> मालमत्ता कर थकबाकीमुळे महाराष्ट्र बँक शाखेविरुध्द धुळे मनपाची कारवाई

बालविवाहाचे हे अजस्त्र आव्हान पेलण्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी ठरविले असून ऑपरेशन अक्षता- मुलगी वयात आल्यानंतरच विवाहाची दक्षता ही मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या आशासेविका, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच आणि बीट अंमलदार यांचे पथक कार्यरत केले जाणार आहे. याव्दारे गावात बालविवाहाविरोधात जनजागृतीसह विविध उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. यासाठी जिल्हा पोलीस दलामार्फत खास हेल्पलाईन नंबर देखील जाहीर केला जाणार आहे.

प्रत्येक ग्रामसभेत बालविवाहाविरोधात ठराव देखील करुन घेतले जाणार असून अशा पद्धतीने ग्रामसभेत ठराव करणाऱ्या कोराई आणि भुजगाव ग्रामपंचायतींचा बुधवारी सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते या मोहिमेच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रारंभी तळोदा तालुक्यात प्रायोगिक तत्वावर मोहीम राबविली जाणार आहे. गरज भासल्यास कठोर पावले उचलण्याचे संकेत देखील पोलीस दलामार्फत देण्यात आले आहेत. उदघाटन कार्यक्रमानंतर पोलीस दलामार्फत जनजागृतीसाठी दुचाकी फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अप्पर अधीक्षक नीलेश तांबे,  जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, आशासेविका, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police initiative for operation akshata campaign to prevent child marriage in nandurbar district zws