लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : गावातील रस्ते कधी सुधारणार, यांसह इतर समस्यांसंदर्भात अनेक प्रश्न जळगावच्या जामनेर तालुक्यातील लिहा तांडा गावातील तरुणांनी उपस्थित केल्याने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला. यासंदर्भातील चित्रफित समाजमाध्यमांत आल्यानंतर गावात कोणताही गोंधळ झाला नसून विरोधक राजकारण करत आहेत, अशी सारवासारव महाजन यांनी केली आहे.

जामनेर हा गिरीश महाजन यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. महाजन हे शुक्रवारी जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे एका कार्यक्रमानिमित्ताने गेले असता युवकांनी गावातील रस्त्यांच्या बिकट स्थितीसह गावातील समस्या कधी सोडविणार, असे प्रश्न केले. त्यामुळे महाजन यांना दुचाकीवरुन गावातून निघून जावे लागल्याची चित्रफित समाजमाध्यमात आल्यानंतर विरोधकांकडून महाजन यांच्यावर टीका करण्यात आली.

आणखी वाचा-नाशिक : मालेगाव स्टँड परिसरातील वाहतूक मार्गात बदल

यासंदर्भात महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. लिहा तांडा गावातील रस्त्यांसाठी निधी अगोदरच मंजूर करण्यात आला आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल, परंतु, विरोधक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत, गावातील अनेक जण पूर्वीपासून भाजपचे कार्यकर्ते राहिले आहेत. आजही ते आपल्याबरोबर असून कोणताही गोंधळ झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.