चारुशिला कुलकर्णी
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील बेबनावानंतर नाशिकमध्ये गळती थांबविण्यासाठी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना साकडे घातले आहे. त्यानुसार भव्य स्वरूपात महिला मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र मेळाव्यास रश्मी ठाकरे उपस्थित राहतील किंवा नाही, याविषयी अनिश्चितता आहे.
राज्यात गळती सत्र सुरू असताना नाशिक मात्र काही महिन्यांपूर्वी ठाकरे गटासाठी अभेद्य राहिले होते. नाशिकची जबाबदारी संपर्क नेते खा. संजय राऊत यांच्यावर होती. पडझडीतही नाशिकचे शिवसैनिक आमच्याकडे असल्याचा दावा खासदार राऊत करीत असत. काही दिवसांनी त्यांचा भ्रमाचा भोपळा फुटला. खासदार हेमंत गोडसे, नाशिक महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासारखे मोहरे शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यानंतर राऊत हे नाशिक दौऱ्यावर असले की शिंदे गटाकडून ठाकरे गटातील माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश सोहळा करायचा, हे ठरूनच गेले होते. पक्षांतराचा हा खेळ रंगलेला असताना उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे जाहीर सभा असताना नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपणास विश्वासात घेतले जात नाही, वैयक्तिक टिप्पणी केली जाते, अशी कारणे पुढे करीत शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये शिवसेनेच्या स्वीकृत माजी नगरसेवक अॅड. श्यामला दीक्षित, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शोभा गटकळ, शोभा मगर, अनिता पाटील आदींचा समावेश आहे. भक्कम असलेली महिला आघाडीही फुटल्याने ठाकरे गटासाठी हा मोठा हादरा ठरला.
रश्मी ठाकरे यांच्या उपस्थितीत एप्रिल महिन्याच्या अखेर नाशिकमध्ये महिला मेळावा घेण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याआधी रश्मी यांनी मुंबईत अनेक ठिकाणी कार्यक्रमांना हजेरी लावली आहे, मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. मालेगाव येथे झालेल्या सभेसही रश्मी ठाकरे उपस्थित होत्या.
पदाधिकाऱ्यांच्या बैठका
नाशिक येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या अनुषंगाने नियोजनाने वेग घेतला आहे. विभागनिहाय महिला आघाडीसह अन्य पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत. महिलांना मेळाव्यापर्यंत पोहचता यावे यासाठी वाहतूक व्यवस्था, महिलांची काही गैरसोय होऊ नये यासाठी काय करता येईल, अशा वेगवेगळय़ा विषयांवर काम सुरू असताना ज्यांच्यासाठी हा खटाटोप सुरू आहे, त्या रश्मी ठाकरे मेळाव्यास उपस्थित राहणार का, याविषयी पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अनिश्चिततेच्या सावटाखाली कार्यकर्त्यांची धावपळ मात्र पाहण्यासारखी आहे.
रश्मीताई यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी अद्याप तारीख दिलेली नाही. एप्रिलअखेर हा मेळावा होईल. यासाठी सर्वाना मध्यवर्ती ठरणारे दादासाहेब गायकवाड सभागृह येथे मेळावा घेण्यात येईल. रश्मीताईंची तारीख मिळाली की मेळाव्याचे नियोजन सुरू होईल. सध्या विभागनिहाय बैठका सुरू आहेत.
– सुधाकर बडगुजर (महानगरप्रमुख, शिवसेना ठाकरे गट)
मेळाव्यासाठी तारीख मिळालेली नाही. त्यामुळे मेळावा होईल की नाही हे सांगता येत नाही. मात्र त्या अनुषंगाने बैठका सुरू आहेत.
– दत्ता गायकवाड (ठाकरे गटाचे पदाधिकारी)