नाशिक: शिवसेनेचे पदाधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्यावरील हल्ला प्रकरणात तपास अधिकाऱ्यांनी शासकीय पंच न घेता संशयितांचे नातेवाईकच पंच म्हणून घेतले. गुन्ह्यातील संशयितांना सोडविण्यासाठी ही कृती केली गेली असून ती न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन असल्याची तक्रार करीत शिवसेनेने (ठाकरे गट) या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

हेही वाचा >>> जळगाव: “मी जर तीन महिन्यांचं बाळ, तर मला…” सुषमा अंधारे यांचा गुलाबराव पाटील यांना टोला

रेडक्रॉस सिग्नलजवळ कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. उपचार सुरूअसतांना १८ जुलै २०२२ रोजी त्यांचा जबाबही नोंदविण्यात आला होता. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असतांनाही संशयितांना पकडण्यात तपास अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या हल्ल्याची काहींनी सुपारी दिल्याचे आमचे म्हणणे असताना ते शिंदे गटाचे असल्याने पोलिसांनी भ्रमणध्वनी अहवालावरून त्यांच्यावर कारवाई केली नसल्याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले. न्यायालयाच्या आदेशान्वये पंचनामे करतांना शासकीय पंच घेणे गरजेचे होते. पण तपासाधिकाऱ्यांनी तसे केले नाही. जीवन दिघोळे हा पंच संशयित सागर दिघोळेचा भाऊ आहे. दुसरा पंच अश्पाक रंगरेज याचेही संशयिताशी चांगले संबंध आहेत. प्रमोद वंजारी हा पंचही संशयिताचा नातेवाईक तर करण राजपूत हा पंच संशयित सूरज राजपूतचा भाऊ आहे. गुन्ह्यातील संशयितांना सोडविण्यासाठीच शासकीय पंच न घेता तपास अधिकाऱ्यांनी संशयितांच्या नातेवाईकांना पंच म्हणून घेतले. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई न झाल्यास पोलीस महासंचालकांकडे दाद मागितली जाईल. गरज भासल्यास न्यायालयात अवमान याचिकाही दाखल करावी लागेल, असा इशारा महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपा माजी गटनेते विलास शिंदे, विधानसभाप्रमुख बाळासाहेब कोकणे, योगेश बेलदार आदींच्या शिष्टमंडळाने निवेदनात दिला आहे.