नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील बी. डी.भालेकर माध्यमिक शाळा पाडून त्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मराठी शाळा पाडून विश्रामगृह बांधण्यास माजी विद्यार्थी, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते यांनी कडाडून विरोध दर्शविला.

शाळा वाचविण्यासाठी आंदोलन सुरू केले. शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या भूमिकेने मनपा प्रशासनाला शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय अखेर रद्द करावा लागला. राज्यात पहिल्यांदा मराठी शाळा वाचविण्यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधी सरसावले आणि त्या लढ्याला यश आले.

बी डी भालेकर शाळा वाचवा समितीचे आंदोलन १६ दिवसांपासून सुरू होते. या काळात अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची भेट घेत शाळा वाचवली पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. आंदोलकांनीही शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेत आपली भूमिका स्पष्ट करण्याचा आग्रह धरला होता. तेव्हा मंत्री भुसे यांनी शाळेच्या जागेवर शाळा होणे योग्य ठरेल हे नमूद केले होते. शिवसेना (शिंदे गट) नाशिक जिल्हा प्रमुख व माजी उपमहापौर अजय बोरस्ते यांनी आंदोलनाची भेट घेतली.

मंत्री भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून आंदोलकांशी चर्चा घडवून आणली. यावेळी भुसे यांनी विश्रामगृह बांधण्याचा निर्णय रद्द झाल्याची अधिकृत माहिती दिली व “बी. डी. भालेकर शाळा पुन्हा त्याच ठिकाणी अद्यायावत स्वरूपात सुरू करण्याची जबाबदारी माझी आहे” असे आश्वासन दिले. याबाबत नगरविकास विभागाकडून शाळेसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. नाशिकसाठी कुंभमेळा निधी मिळणार असून, त्यातूनही शाळेसाठी विशेष प्रयत्न केले जातील. तसेच समितीची बैठक लवकरच उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करून देण्याचेही त्यांनी मान्य केले.

अजय बोरस्ते यांनी सांगितले की, नाशिक भेटीदरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनीही बी. डी. भालेकर शाळेसाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. परिसरात सर्वसामान्य व गरजू कुटुंबे राहतात; त्यांच्या मुलांचे शिक्षण अबाधित राहण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे त्यांनी म्हटले. यापुढे मनपा, नगरविकास विभाग आणि शिक्षण विभागाकडून सर्व पाठपुरावा करण्याचे आश्वासन बोरस्ते यांनी समितीला दिले. दिलेल्या शब्दाप्रमाणे तातडीने पुढील प्रक्रिया सुरू करण्याची अपेक्षा आहे.

समितीच्या आंदोलनामुळेच विश्रामगृहाचा प्रस्ताव रद्द झाला असून हा आंदोलनाचा विजय आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आता शाळेच्या जागेवरच पुन्हा शाळा सुरू करण्यासाठी समिती पाठपुरावा करणार आहे. मराठी शाळा वाचविण्यासाठी सुरू असलेले आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात राजू देसले, दीपक डोके, तल्हा शेख, मनोहर पगारे, डॉ. ठकसेन गोराणे, ॲड. प्रभाकर वायचळे, पद्माकर इंगळे, वसंत एकबोटे आदींचा सहभाग होता.