नाशिक – सातपूर गोळीबार प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे आणि त्याचा मुलगा दीपक लोंढे यांची रविवारी न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर अंबड पोलिसांनी एका गुन्हात त्या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांना रविवारी न्यायालयात उपस्थित केले असता २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याने त्यांची संपूर्ण दिवाळी कोठडीतच जाणार आहे.

सातपुर येथील हॉटेलमधील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी प्रकाश लोंढेसह त्याचा मुलगा दीपक आणि अन्य नऊ गुन्हेगारांना ताब्यात घेतले. सध्या लोंढे टोळीतील नऊ जण पोलीस कोठडीत असून मुख्य सूत्रधार भूषण लोंढे अद्याप फरार आहे. आतापर्यंत लोंढे पिता-पुत्राच्या पोलीस कोठडीत तीन वेळा वाढ झाली आहे. यादरम्यान, लोंढेच्या घराची झडती घेतली असता भुयार आढळले. त्या ठिकाणी दोन कुऱ्हाड तसेच चाकु सापडला.

१७ ऑक्टोबर रोजी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आतापर्यंत सातपूर गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे, देवेश शिरताटे, शुभम गोसावी यांच्यासह सनी विठ्ठलकर याला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, लोंढे पिता- पुत्राची कोठडी रविवारी संपल्यावर अंबड येथील एका खंडणीच्या गुन्ह्यात अंबड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अत्तरदे यांचा पुष्कर बंगला बळकावल्या प्रकरणी लोंढे टोळीवर खंडणीचा स्वतंत्र गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी अंबड पोलिसांच्या पथकाने नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून लोंढे याला ताब्यात घेतले. तसेच अंबड पोलिसांच्या वतीने पुष्कर बंगला सील करण्यात आला आहे. रविवारी प्रकाश लोंढे व त्याचा मुलगा दीपक याला न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.