जळगाव – तालुक्यातील विदगाव येथे तापी नदीच्या पुलावर वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने मोटारीला धडक दिल्याने आईसह १२ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जळगाव तालुका पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली आहे.

जळगाव येथील इंदिराबाई पाटणकर प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका मिनाक्षी निलेश चौधरी (३८) आणि त्यांचा मुलगा पार्थ चौधरी (१२), अशी मृतांची नावे आहेत. तर निलेश प्रभाकर चौधरी (४०) आणि ध्रूव चौधरी (चार, सर्व रा. विठ्ठल नगर, जळगाव) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

निलेश चौधरी हे धानोरा (ता. चोपडा) येथील ए. व्ही. मिशन शाळेत उपशिक्षक आहेत. पती, पत्नी तसेच दोन्ही मुलगे मिळून संपूर्ण चौधरी परिवार चोपडा येथून धार्मिक कार्यक्रम पार पाडून जळगावला मोटारीने मंगळवारी रात्री परत येत होता. साधारण साडेदहाच्या सुमारास विदगावकडून डांभूर्णीकडे जाणाऱ्या विना क्रमांकाच्या वाळुने भरलेल्या डंपरने चौधरी परिवाराच्या मोटारीला तापी पुलावर समोरून जोरदार धडक दिली.

डंपरने दिलेल्या जोरदार धडकेमुळे मोटार आधी तापी पुलाच्या कठड्यावर आदळली, त्यानंतर थेट नदीच्या पात्रात पाणी नसलेल्या भागात कोसळली. अपघातानंतर चालकाचे नियंत्रण सुटलेला डंपर देखील पुलावर उलटला. तापी पुलावर घडलेल्या भीषण अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी लगेच धाव घेतली. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याची व्यवस्था केली.

घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात रवाना केले. रात्री उशिरापर्यंत पुलावर उलटलेला वाळुचा डंपर बाजुला करून ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. या प्रकरणी बुधवारी सकाळी डंपर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अपघातास कारणीभूत ठरलेल्या डंपरचा चालक पसार होण्यात यशस्वी झाला. तालुका पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.

जळगाव तालुक्यात सर्रास सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन रोखण्यात महसूल विभागाला अपयश आले आहे. त्यामुळे गिरणा, तापी तसेच अन्य नद्यांमधून पावसाळ्यातही वाळुचा उपसा केला जात असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी रात्री स्वत: नदीपात्रात उतरून वाळू माफियांवर कारवाईचा बडगा काही दिवसांपूर्वी उगारला होता. त्यानंतरही वाळू माफियांची मुजोरी कायम आहे. रात्री-अपरात्री अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. कायद्याचा कोणताच धाक न राहिलेले माफिया भरधाव वेगाने डंपर तसेच ट्रॅक्टर पळविताना समोर येईल त्याला चिरडण्यासही मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.