धुळे – जाती, धर्म वेगवेगळे असले तरी एकतेच्या भावनेतून आयुष्य जगण्यासह शहरात एकता, शांततेसाठी जातीयवाद्यांना रोखण्याचा निर्धार येथे आयोजित सेक्युलर परिषदेत व्यक्त करण्यात आला. शहरातील कल्याण भवन येथे ही परिषद झाली. परिषदेत १६ धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष, ३० सामाजिक संघटना, विचारवंत, बुद्धिजीवी, धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते आदींनी सहभाग घेतला.

भविष्यात होणाऱ्या निवडणुका, राजकीय उलथापालथ यामुळे धर्मांध, जातीयवादी लोक समाजातील वातावरण बिघडण्याचे काम करू शकतात. काही कट्टरतावादी जाती-धर्मातील लोकांमध्ये द्वेष, मत्सर निर्माण करू शकतात. शहरातील किंवा जिल्ह्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करू शकतात, समाज माध्यमाव्दारे तणाव निर्माण केला जाऊ शकतो, अशा विविध संभाव्य घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही परिषद घेण्यात आल्याचे समन्वयक रणजीतराजे भोसले यांनी सांगितले.

हेही वाचा – परीक्षा काळातच नाशिकची सिटीलिंक बससेवा पुन्हा ठप्प

धुळे शहरात विविध जाती, धर्माचे, पंथाचे विचाराचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शहराचा विकास केला पाहिजे. माझ्या शहराची जमीन व माझ्या शहराची हवा हेच माझे जीवन आहे. मी जगणार येथेच आणि मरणार येथेच, हा हेतू ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याने सेक्युलर परिषद घेण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, गारपीट

या परिषदेत शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप आणि भाजपशी संबंधित संघटनांचा अपवाद वगळता इतर राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थांनी सहभाग घेतला. मोहम्मद समी, रिटा दीदी, माजी आमदार शरद पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, डॉ. अनिल पाटील, डॉ. सर्फराज अन्सारी, हेमंत मदाने आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रणजीतराजे भोसले यांनी केले. आभार सत्तार शाह यांनी मानले. परिषदेनिमित्त सर्व जाती-धर्मातील लोकांना एकत्र आणण्याचे काम रणजितराजे भोसले यांनी केल्याबद्दल त्यांचा काही संघटनांनी सत्कार केला.