जळगाव – विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर गलितगात्र अवस्था झालेल्या पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी काँग्रेसने नवीन प्रदेश कार्यकारिणीवर जळगाव जिल्ह्यातील तब्बल सात जणांची नियुक्ती केली आहे. त्यापैकी तीन जणांची प्रदेश उपाध्यक्ष, दोन जणांची सरचिटणीस आणि इतर दोन जणांची सचिव पदावर वर्णी लागली आहे.
जळगाव जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असे. मधुकरराव चौधरी यांच्यासह प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांनी त्यावेळी काँग्रेसची धुरा समर्थपणे सांभाळली. विधानसभा अध्यक्ष पदाचा मान मिळालेले मधुकरराव चौधरी यांनी त्या काळात तब्बल १३ खात्याचे मंत्री म्हणून कामही पाहिले होते. शिक्षण, अर्थ व नियोजन, महसूल, पाटबंधारे, ऊर्जा, आरोग्य, नगर विकास, सांस्कृतिक कार्य आणि वने आदी विभागांचा त्यात समावेश होता. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसची सत्ता असल्याने जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट रोवली गेली होती. साधारणतः १९८५ पर्यंत अभेद्य गड असलेल्या काँग्रेसला त्यानंतर मात्र उतरती कळा लागली.
२००९ मध्ये रावेरमधून शिरीष मधुकरराव चौधरी यांनी पुन्हा मुसंडी घेत विधानसभा निवडणूक जिंकली. मधल्या एका निवडणुकीचा अपवाद वगळता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी भाजप उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा पराभव करून पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले होते. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र शिरीष चौधरी स्वतः उमेदवारी न करता आपले पूत्र धनंजय चौधरी यांना पुढे केले. काँग्रेसने धाडस करून धनंजय यास उमेदवारी देखील दिली. परंतु, त्याचाच फटका काँग्रेसला रावेरमध्ये विधानसभा निवडणुकीत बसला. भाजप उमेदवार अमोल जावळे यांच्यापुढे चौधरी परिवाराचा निभाव लागला नाही. त्यासोबत भुसावळ आणि अमळनेरमध्ये काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागले. त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसने नवीन प्रदेश कार्यकारिणीत यावेळी जिल्ह्यातील सात पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.
त्यापैकी चोपड्याचे माजी नगराध्यक्ष ॲड.संदीप भैया पाटील यांच्यासह लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे आणि भुसावळमधील योगेंद्र पाटील यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. धनंजय चौधरी आणि मुफ्ती हारून नदवी यांना सरचिटणीस पद देण्यात आले आहे. तसेच डॉ. ऐश्वरी राठोड आणि प्रवीण सुरवाडे यांना सचिव करण्यात आले आहे. प्रतिभा शिंदे आणि योगेंद्र पाटील हे दोघे गेल्या वेळच्या कार्यकारिणीतही प्रदेश उपाध्यक्षपदी होते. काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीत आपला प्रभाव सिद्ध करता आला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी आपली ताकद वाढेल, असा विश्वास आता पक्षश्रेष्ठींना वाटत आहे. त्यासाठीच प्रदेश कार्यकारिणीवरील महत्वाच्या पदांवर जिल्ह्यातील सात जणांना यावेळी घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.