नाशिक : त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे २०२७ मध्ये आयोजित सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर, नाशिक स्मार्ट सिटी कंपनीमार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली सीसीटीव्हीविषयक आणि ड्रोन प्रकल्पविषयक निविदा अडचणीत सापडली आहे. सत्ताधारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (एकनाथ शिंदे) यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत.

शिंदे गटाचे नाशिक महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी, यासंदर्भात नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना निवेदन दिले आहे. सीसीटीव्ही आणि ड्रोन प्रणालीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली निविदा ही केंद्रीय सतर्कता आयोगाची नियमावली आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून तयार करण्यात आली असल्याचा आरोप तिदमे यांनी केला आहे. निविदेतील काही अटी या विशिष्ट कंपन्यांना अनुकूल ठरतील, अशा पद्धतीने ठेवण्यात आल्या आहेत. एकच प्रस्ताव आणि एकच उपाय अशी अट घालून स्पर्धा मर्यादित करण्यात आली आहे.

जीपीयूवर आधारित सर्व्हर आणि आयसीसीसी एकत्रिकरणासारख्या अटींमुळे निविदा काही ठराविक कंपन्यांकडे झुकत आहेत. गुणवत्ता आणि खर्च यावर आधारित मूल्यांकन पद्धतीत तांत्रिक गुणांना अतिशय जास्त वजन देण्यात आले असून आर्थिक गुणांना कमी महत्त्व दिल्याने प्रक्रिया पक्षपाती होण्याची शक्यता आहे. तसेच प्रकल्प पूर्ण करण्याचा कालावधी आणि दोषदुरुस्ती कालावधी स्पष्टपणे नमूद केलेला नसल्याचे, तसेच पारदर्शकतेसाठी आवश्यक असलेली इंटिग्रिटी पॅक्ट आणि स्वतंत्र बाह्य निरीक्षकाची (आय.ई.एम.) तरतूदही नसल्याचे प्रवीण तिदमे यांनी निदर्शनास आणले आहे.

निविदा काही ठराविक ठेकेदारांच्या फायद्यासाठी तयार करण्यात आली असून ती तत्काळ रद्द करावी. अन्यथा शिवसेना आंदोलन करेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा प्रवीण तिदमे यांनी दिला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा आणि ड्रोन यांची एकत्र निविदा काढणे अयोग्य आहे. हे दोन्ही विषय स्वतंत्र असून यांचे पुरवठादार देखील स्वतंत्र असल्याचे तिदमे यांनी लक्षात आणून दिले आहे.

तसेच जीपीयू. आधारित सर्व्हर आणि आय.सी.सी.सी. एकत्रिकरणासारख्या अटींमुळे निविदा काही ठराविक कंपन्यांकडे झुकत असल्याचा ठपकाही तिदमे यांनी निवेदनाद्वारे ठेवला आहे. निविदेत त्रुटी, नियमभंग आणि पक्षपात झाल्याचा आरोप शिवसेनेने केला असून ही निविदा तत्काळ रद्द करून नव्याने पारदर्शक प्रक्रिया राबवावी, अशी मागणीही प्रवीण तिदमे यांनी केली आहे.शिंदे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखाने केलेल्या या आरोपांमुळे भाजप आणि शिंदे गटात शीतयुध्द सुरु असल्याचे मानले जात आहे.