लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : रणरणत्या उन्हात मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने विविध सुविधांचा दावा केला असला तरी बहुसंख्य केंद्रांवर मतदारांना अडचणींना तोंड द्यावे लागले. मतदार यादीत नाव शोधण्यापासून सुरू झालेली अडथळ्यांची शर्यत मतदान केंद्रात खोली शोधण्यापर्यंत सुरु राहिली. काहींना तर रांगेत उभे राहूनही मतदान करता आले नाही.

नाशिक आणि दिंडोरी मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. दुपारचे ऊन टाळण्यासाठी सकाळी सातपासून मतदारांनी केंद्रांवर गर्दी करण्यास सुरूवात केली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मतदान केंद्रावर पाणी, विजेची व्यवस्था, उष्माघातापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, महिला आणि पुरूष मतदारांच्या वेगळ्या रांगा, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य, अशा काही सूचना करण्यात आल्या होत्या. परंतु, प्रशासनाच्या सुचनांना हरताळ फासला गेला. सकाळी वेगात असलेले मतदान दुपारनंतर संथ झाले. शाळा परिसरातील केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. त्यातही एखाद्या वर्गात सर्वाधिक रांग तर काही वर्ग रिकामे अशी स्थिती होती.

आणखी वाचा-नाशिक : समस्यांकडे दुर्लक्षाच्या निषेधार्थ मतदानावर बहिष्कार

नाशिक येथील वाघ गुरूजी शाळा, सिडको येथील पेठे विद्यालय, आनंदवली येथील महापालिका शाळा, जुने नाशिक परिसरातील पिंजार घाट रोडवरील महापालिका उर्दु शाळा यासह जिल्ह्यातील काही केंद्रांवर मतदान केंद्र नियोजनात सावळा गोंधळ राहिला. कुठे मतदान केंद्रांवर महिला पुरूष मतदारांच्या रांगा वेगळ्या नव्हत्या. रांगेत मतदान करण्यासाठी सर्रास कोणीही मध्ये शिरत होते. याठिकाणी असलेल्या पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. सातत्याने या ठिकाणी वाद सुरू राहिले. मतदान ओळखपत्र म्हणून शासनाने दिलेल्या कागदपत्रांसाठी संबंधित केंद्र अधिकाऱ्यांकडून अडवणूक करण्यात आली.

महिला, पुरूषांच्या रांगा स्वतंत्र नव्हत्या. एका केंद्रावर निमुळत्या जागेत उभे राहून मतदारांना मतदान केंद्रात जाता येत होते. या ठिकाणी पिण्याचे पाणी नव्हते. पुरेसा प्रकाश, मोकळ्या हवेची व्यवस्था नव्हती. ज्येष्ठ नागरिकांना सोडण्यात टाळाटाळ होत राहिली. तर लोकप्रतिनिधींचे मतदान केंद्रावरील काही प्रतिनिधी आपल्या ओळखीच्या लोकांना थेट मध्ये आणत होते. पोलिसांना याविषयी लक्ष देण्यास सांगण्यात आले असता, मतदान केंद्रात थेट तक्रार करा, हे आमचे काम नाही, असे उत्तर देण्यात आले. यामुळे मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या मतदारांना एक तासांहून अधिक कालावधी लागला. काहींनी तर या संथपणामुळे अर्ध्या रांगेतून बाहेर पडणे पसंत केले.

आणखी वाचा-नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर जय श्रीराम, अबकी बार ४०० पारच्या घोषणा

कर्मचाऱ्यांचे हाल

नाशिक आणि दिंडोरी मतदार संघात हजारोहून अधिक शिक्षक, अन्य सरकारी कर्मचारी यांच्यावर केंद्रांवरील मतदान सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी होती. रविवारी दुपारनंतर ही मंडळी मतदान केंद्रांवर पोहचली. तेव्हापासून वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत असतांना सोमवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरूवात झाली. बहुसंख्य केंद्रावर मतदारांची कमी अधिक प्रमाणात ये-जा सुरु होती. सकाळी संबंधित कर्मचाऱ्यांना नाश्ता देण्यात आला. मात्र गर्दीमुळे त्यांना नाश्ता करण्यासही वेळ मिळाला नाही. दुपारचे जेवण दोन वाजूनही कर्मचाऱ्यांना घेता आले नाही. काही केंद्रांवर पाच मिनिटांसाठी काम थांबवून कर्मचाऱ्यांनी जेवण केले. कुठे मतदारांची संख्या पाहता जेवण घेणे काहींनी टाळले. केवळ फळे खात, पाणी पित काम सुरू ठेवले. कामाचा ताण पाहता काही वेळासाठी त्यांना मदतनीस देणे अपेक्षित होते. आपतकालीन परिस्थिती उद्भल्यास आम्हाला बदली जोडीदार मिळत असल्याचे अनेकांनी सांगितले.