नंदुरबार – रस्त्याने जाणाऱ्या महिलांची छेड काढून उपस्थित नागरिकांवर दादागिरी करणे एका रोडरोमिओला चांगलेच भोवले. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पोलिसांनी त्याला आपला हिसका दाखवित त्याला माफी मागावयास लावत धिंड काढली. असे कृत्य करु पाहणाऱ्यांना पोलिसांच्या या कृतीमुळे जरब बसली आहे. बस स्थानक आणि लगतच्या परिसरात पोलिसांनी संशयित रोडरोमिओला फिरवले. या प्रकाराची सध्या शहादा शहरात चर्चा सर्वत्र असून पोलिसांच्या या कृत्याचे समर्थन केले जात आहे.

पोलिसांनी सर्वांसमोर अशा रोडरोमिओंना हाणले पाहिजे, अशी प्रतिक्रियाही व्यक्त होत आहे.नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात महिलांना वर्दळ कमी असले्या जागेवर गाठून शर्ट काढून आपली शरीरयष्टी दाखवत विचित्र हावभाव काही जण करीत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. संबंधित रोडरोमिओ नशेबाज असून त्यातूनच तो हे कृत्य करुन आपल्या मित्रांच्या दुचाकीवरुन लगेच पळून जात असे. या रोडरोमिओने व्यायाम करुन एखाद्या शरीरसौष्ठवपटूप्रमाणे शरीर कमावले होते.

परंतु, नशेत आपले हे शरीर महिलांना दाखविण्याची त्याला वाईट सवय लागली होती. या रोडरोमिओच्या कृत्याने शहादा शहरातील महिला धास्तावल्या होत्या. विशेष म्हणजे असे करतांना त्याला अटकाव करणाऱ्यांवर तो दादागिरी करत असे.

या रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांनी सापळा रचला. महिलांची अशीच छेड काढत असतांना त्याला ताब्यात घेतले. त्याला धडा शिकवण्यासाठी शहादा शहरातील अंत्यत वर्दळीचा परिसर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून त्याची वरात काढत रस्त्यावरील नागरिक आणि महिलांची त्याला माफी मागण्यास पोलिसांनी त्याला भाग पाडले. पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीची चित्रफीत सध्या समाज माध्यमात फिरत असून महिलांची छेड काढणाऱ्यांना पोलीस कशा पद्धतीने वागणूक देतात, याबाबत चर्चाही रंगत आहे.

पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीमुळे एखाद्या युवतीची, महिलेची छेड काढू पाहणाऱ्यांना जरब बसणार असल्याने पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होताना दिसत आहे. पोलिसांनी काही कारणास्तव या रोडरोमिओचे नाव जाहीर केलेले नाही. ज्या परिसरात पोलिसांनी या रोडरोमिओची वरात काढली तो शहाद्यातील अत्यंत वर्दळीचा परिसर मानला जातो. लगतच बस स्थानक असल्याने याच ठिकाणाहून रोज शकडो विद्यार्थिनींची ये – जा होत असते. त्यामुळे पोलिसांनी आपल्या या कृतीतून महिलांची छेड काढणाऱ्यांना अशा प्रकारची शिक्षा होऊ शकते, असा थेट संदेश दिल्याचे दिसत आहे.